कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, याप्रश्नी सोमवारी (दि. ६) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर पुकारण्यात आलेले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंगळवारी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. खंडपीठ कृती समितीच्या सहा जिल्ह्यांतील सदस्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी गत आठवड्यात सहा जिल्ह्यांच्या खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने कऱ्हाड येथील सभेमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानावर सहा एप्रिलला धरणे आंदोलन करण्याचा ठराव केला होता. त्यानंतर २६ मार्चला पालकमंत्री पाटील व भाजपचे महानगर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईत चर्चा झाली. येथे झालेल्या चर्चेमध्ये पुढील दोन कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ठराव करण्यासंबंधी मिळालेली हमी या पार्श्वभूमीवर खंडपीठ कृती समितीने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत चर्चा केली.यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे म्हणाले, सर्किट बेंचसाठी कॅबिनेटचा ठराव करण्यासाठी प्रस्तावावर सही करून पाठविला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.६) आंदोलन करणे योग्य होणार नाही. तसेच पुढील दोन कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री सर्किट बेंचच्या ठरावावर निर्णय घेतात की नाही, त्याची प्रतीक्षा करावी. त्यानंतरच यावर सकारात्मक निर्णय घ्यावा. परंतु, १७ एप्रिलला मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन व उपोषण होईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. तथापि, हा निर्णय सहा जिल्ह्यांतील कृती समितीचे सदस्य असलेल्या जिल्हा व तालुका बारच्या अध्यक्षांना कळवून त्यांच्याशी चर्चा व विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठरले.सभेला अॅड. एम. डी. आडगुळे, अॅड. संपतराव पवार, अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. अजित मोहिते, अॅड. शिवाजी राणे, अॅड. दीपक पाटील, अॅड. पी. जे. पोवार, अॅड. पी. एस. भावके, अॅड. प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष अॅड. के. व्ही. पाटील यांनी आभार मानले.
सर्किट बेंचप्रश्नी आंदोलन स्थगित
By admin | Published: April 01, 2015 12:24 AM