कोल्हापूर : वडापाव विक्रेत्याकडे हप्ता मागणाऱ्या तोतया पोलिसांना नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शिवाजी पेठेत विद्यार्थी कामगार चौकात घडला.
आदर्श अनिल भोसले व वैभव शहाजी कुरणे (दोघे रा. वारे वसाहत) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. संशयित कुरणे याने मारहाण करणाऱ्या नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेत पलायन केले. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत सुजित आनंदराव सुतार (वय ३२, रा. रामानंदनगर) यांनी राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी पेठ परिसरात संशयित आदर्श भोसले व वैभव कुरणे हे संशयित फिरत होते. सरनाईक कॉलनीत सुजित सुतार हे फर्निचर व्यावसायिक रस्त्याकडेला थांबले होते. त्याच वेळी संशयित भोसले व कुरणे यांनी तेथे जाऊन त्यांना हटकले, तू इथे काय करतो? आम्ही पोलीस आहोत.
आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चल,ह्ण असे सांगून त्यांनी सुजितला दुचाकीवरून जय भवानी तरुण मंडळाजवळ नेले आणि त्याला लुटण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्याजवळ पैसे नसल्याचे लक्षात येताच त्याला वाटेतच सोडून तोतया पोलीस निघून गेले.याच दोघा तोतया पोलिसांनी विद्यार्थी कामगार चौकात वडापाव विक्रेत्याकडेही पैसे मागितले होते, त्यावेळी त्याने ह्यओळखपत्र दाखवाह्ण असे सांगितले. ओळखपत्र नसल्याने दोघेही तोतया पोलीस गोंधळून गेले. त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना ते दोघे तोतया पोलीस असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्या दोघांना बेदम चोप दिला.
दरम्यान, मारहाण सुरू असतानाच वैभव कुरणे हा नागरिकांच्या तावडीतून सुटका करून घेऊन पळून गेला. काही वेळात सुजित सुतार हे या रस्त्यावरून पुढे जाताना त्याला तो तोतया पोलीस नजरेस पडला. त्यांना धमकावणारा भामटा असल्याचे निदर्शनाला आल्याने त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात भोसले व कुरणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.