कोल्हापूर : येथील बसंत-बहार चित्रमंदिरासमोरील नंदनवन पार्कजवळ चोरी करताना तीन अल्पवयीन मुलांना नागरिकांनी मंगळवारी पकडले. या मुलांनी चोरलेल्या किरकोळ वस्तू नागरिकांनी ताब्यात घेतल्या आणि त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, चोरी करणाऱ्यांसमवेत असलेल्या महिलांनी पलायन केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्टेशन रोडवरील व्यापारी अनिल मार्ले हे ऋषभ सिद्धी पार्कमधील अपार्टमेेंटनजीक आलेले महापुराचे पाणी ओसरले का, हे पाहण्यासाठी दुपारी गेले होते. त्यावेळी त्यांना काही अल्पवयीन मुलांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. याबाबत त्यांनी मुलांना जाब विचारला. त्यावेळी या मुलांनी चोरलेल्या वस्तू टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मार्ले यांनी डॉक्टर नानिवडेकर आणि काही नागरिकांच्या मदतीने या चोरट्यांना पकडले. त्यांच्याकडे गिझर, स्टेफनी, पाच सायकली, दोन लोखंडी गेट, खाट, प्लास्टिकचे बॅरेल यांसह अन्य साहित्य सापडले. हे साहित्य नागरिकांनी त्यांच्याकडून काढून घेतले. संशयित अल्पवयीन मुलांना शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चोरी करणाऱ्यांसमवेत असलेल्या महिला चोरलेले काही साहित्य घेऊन पसार झाल्या.