कोल्हापूर : शहरात प्रत्येक आठवड्याला या ना त्या कारणाने पाणीपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत. सोमवारीसुद्धा बालिंगा येथील महावितरणच्या उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कारणाने पाणीपुरवठा बंद ठेवल्याने अर्ध्या अधिक शहरातील पाणीपुरवठा सकाळी १0 वाजल्यापासून खंडित झाला.आॅगस्ट महिन्यातील महापुराच्या काळात सलग १५ दिवस पाणीपुरवठा बंद राहिला, त्यातून बाहेर महापालिका प्रशासन बाहेर पडते न पडते तोच कधी शिंगणापूर, तर कधी बालिंगा उपसा केंद्र आठवड्याला दुुरुस्तीच्या नावाखाली बंंद ठेवण्यात येत आहे. वारंवार खंडित होत असलेल्या पाणी पुरवठ्याचा त्रास नागरिकांना होत आहे. काय असेल ती दुरुस्ती एकदाच करून घ्या, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सोमवारी सकाळी १0 वाजता बालिंगा उपसा व जलशुद्धीकरण केंद्राकडील महावितरणच्या उपकेंद्रातील दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. सकाळी १0 वाजेपर्यंत पाणीपुरवठा झाला; मात्र बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या आणि दुपारी पाणीपुरवठा होणाऱ्या भागात पाणी मिळाले नाही. उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाले. त्यानंतर उपसा सुरू झाला. आज, मंगळवारपासून नियमित पाणीपुरवठा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.