दहावीची परीक्षा : वडूथमध्ये तोतया परीक्षार्थीला पकडले, पहिला पेपर सोपा गेल्याचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:26 PM2018-03-02T14:26:27+5:302018-03-02T14:26:27+5:30
दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागातील भरारी पथकांनी शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) येथील केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या आणि वडूथ (जि. सातारा) येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीला पकडले.
कोल्हापूर : शालेय शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीच्या परीक्षेला गुरुवार (दि. १) पासून सुरुवात झाली. सूचना आणि शुभेच्छा स्वीकारात विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी मराठीचा पहिला पेपर दिला.
पहिल्याच पेपरला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागातील भरारी पथकांनी शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) येथील केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या आणि वडूथ (जि. सातारा) येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीला पकडले.
शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय मंडळातर्फे कोल्हापूर विभागात ही परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षी कोल्हापूर विभागातून १ लाख ५० हजार ३७५ विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
विभागातील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होत आहे. मराठीच्या पहिल्या पेपरसाठी गुुरूवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थीनींची गर्दी होवू लागली. पालक आपल्या पाल्यांचे बैठक क्रमांक शोधून देत होते. त्यासह पेपर सोडविण्याबाबत विविध सूचना ते करीत होते.
परीक्षार्थींना त्यांचे पालक, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या. परीक्षार्थींना पेपरच्या अर्ध्या तासापूर्वी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी अकरा वाजता मराठीचा पेपर सुरू झाला. अनेक पालक पेपर सुटेपर्यंत केंद्राबाहेर थांबून होते. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता. कोल्हापूर विभागातील विविध परीक्षा केंद्रांना भरारी पथकांनी अचानकपणे भेटी दिल्या.
शहरातील काही केंद्रांवर पेपर सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर काहीवेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. दरम्यान, शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने वडूथ येथील परीक्षा केंद्रावर तोतया परीक्षार्थीला पकडले.
वळीवडे केंद्राअंतर्गत असलेल्या शिरोली पुलाची येथील परीक्षा केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणारा परीक्षार्थी सापडला. त्यांच्या शिक्षण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांनी सांगितले.
केंद्राच्या परिसरात उजळणी
केंद्राबाहेरील परिसरात परीक्षार्थी हे नोटस्वर शेवटची नजर टाकत होते. यातील काहीजणांनी चर्चेतून उजळणीला प्राधान्य दिले, काहींनी आपल्या मित्र-मैत्रिणींकडून काही मुद्दे समजून घेतले. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर पहिला पेपर सोपा गेल्याचा आनंद अनेक परीक्षार्थींच्या चेहऱ्यांवर दिसून आला.
पेपर सुटल्यानंतर होळीची तयारी
दहावीला पाल्य असलेल्या पालकांनी गुरुवारी होळीची तयारी ही पेपर सुटल्यानंतर केली. गांधीनगरसह अन्य परिसरात पेपर सुटल्यानंतर पुढील पेपरच्या तयारीचे भान ठेवत परीक्षार्थींनी आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत होळीचा आनंद लुटला.