कोल्हापूर : भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक यांना मतदान करण्याचे आवाहन करताना, त्यांचे चिन्ह सांगताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अनावधानाने कमळाऐवजी घड्याळाचा उल्लेख झाला.
मी घड्याळात होतो लय वर्षे. त्यामुळे पण, काय चिंता नाही इथे काय घड्याळ नाही, सांगत अगदी दुसऱ्या क्षणाला या चुकीची दुरुस्ती करुन कमळ चिन्हाचे बटण दाबा असे त्यांनी सांगितले. गोकुळ शिरगांव (ता. करवीर) येथील जाहीर सभेतील भाषणाचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला.गोकुळ शिरगांव येथे बुधवारी रात्री आठच्या सुमारास वाजता सभा झाली. त्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष महाडिक यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून द्वेष आणि दबावाचे राजकारण सुरु असून ते लोक स्वीकारणार नाहीत. अशा दबावाच्या राजकारणाला येत्या २१ तारखेला आपण उत्तर द्यावे. या तारखेला अमल महाडिक यांचे चिन्ह घड्याळ आहे, असे महाडिक यांनी अनावधानाने आवाहन केले.
चुकीचे चिन्ह सांगितल्याचे लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत कमळ या चिन्हाचा उल्लेख केला. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हास्य फुलले. या सभेच्या सुरुवातीला माजी सरपंच बाबुराव पाटील, एम. एस. पाटील, राजन पाटील, शिवाजीराव कदम, आदींनी मनोगत व्यक्त केले.
अर्जुन मिठारी, एकनाथ पाटील, वसंत पाटील, उदय पाटील, स्वरुप पाटील, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. एम. टी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, महाडिक यांच्या या भाषणाचा व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला. त्यावर सोशल मिडियावर नेटकऱ्यांकडून विविध स्वरुपातील प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.