कोल्हापूर : शहरातील मैदानावर रात्रीच्या वेळी सुरू असलेले ओपन बार बंद करावेत. असे मद्यपान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी क्रीडा सेलतर्फे पोलीस उपअधिक्षका प्रेरणा कट्टे यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे करण्यात आली.शहरातील हॉकी स्टेडीयम,गांधी मैदान, शास्त्रीनगर, दुधाळी, तपोवन, पेटाळा, आदी महापालिकेची मैदाने आहेत. मैदानांवर रात्री मद्यपींचा आणि नशा करणाऱ्या युवकांचा मोठया प्रमाणात वावर असतो.
मद्यपान केल्यानंतर ते दारूच्या बाटल्या मैदानातच टाकतात, तसेच त्या बाटल्या फोडून त्याच्या काचा इतरत्र विखूरल्या जातात. त्यामुळे खेळाडूंना खेळण्यापूर्वी मैदाने स्वच्छ करावी लागतात. त्याच बरोबर काचांमुळे दुखापत होवू नये याची खबरदारी घेतच खेळावे लागते. त्यामुळे अशा मद्यापींवर कारवाई करण्यात यावी.
यावेळी, राष्ट्रवादी क्रिडासेलचे अध्यक्ष सुहास साळोखे, संजय कुराडे, आर. के. पोवार, संजय पडवळे, सुनिल काटकर, रियाज कागदी, सुनिल देसाई, चंद्रकांत सुर्यवंशी, संजय ढावरे, उत्कर्ष बचाटे आदींसह खेळाडू आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उपअधीक्षक कट्टे यांनी ज्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस निरीक्षकांना कारवाई करण्यासंबधी सुचना दिल्या जातील. त्यानूसार कारवाईस सुरूवात केली जाईल. असे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्या.