ढगाळ वातावरणासह कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस, दिवसभर थंड वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 03:49 PM2017-12-05T15:49:11+5:302017-12-05T16:00:22+5:30
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा तडाका कोकण किनारपट्टीवर बसला असला तरी कोल्हापूरातही वातावरणात बदल झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. दिवसभर थंड वारे वाहत होते, आणखी दोन दिवस असेच वातावरण राहिल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा तडाका कोकण किनारपट्टीवर बसला असला तरी कोल्हापूरातही वातावरणात बदल झाला आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. दिवसभर थंड वारे वाहत होते, आणखी दोन दिवस असेच वातावरण राहिल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
‘ओखा’ चक्रीवादळाने सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली आहे. कोल्हापूरातही गेले दोन दिवस ढगाळ वातावरण राहिले आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर कुबट हवामानामुळे सगळीकडे निरूत्साही वातावरण राहिले.
दिसवभरात जास्तीत जास्त २८ डिग्री तर कमीत कमी १६ डिग्री तापमान राहिले. मंगळवारी ताशी २७ किलो मीटर वेगाने वारे वाहिले. येत्या दोन दिवसात असेच वातावरण राहणार असले तरी वाऱ्याचा वेग थोडी कमी होणार आहे. गुरूवारी (दि. ७)वाऱ्याचा वेग कमी होऊन थोडे ढगाळ वातावरण राहिली. शुक्रवारी (दि. ८) मात्र दिवसभर सुर्यप्रकाश राहिल, त्याचबरोबर तापमानातही वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
गेले दोन दिवस बदलेल्या वातावरणाचा अनेकांना फटका बसला असून सर्वाधिक नुकसान वीट व्यवसायिक, गुऱ्हाळ मालकांचे झाले आहे. मध्यंतरी अवकाळी पावसाने चार-पाच दिवस नुकसान केले आता ‘ओखी’ चक्रीवादळाने मेटाकुटीला आणले आहे. गुऱ्हाळघरघरांचे जळण भिजले आहे. त्याचबरोब काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने तेथील ऊस तोडीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
शेतात पाणी झाल्याने ऊसाची वाहतूक करताना अडचण येत असल्याने त्याचा कमी अधिक प्रमाणात साखर कारखान्यांनाही फटका बसला आहे. वीट व्यावसायिकांचे तर या हंगामात कंबरडे मोडले आहे, सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे विटांचे मोठे नुकसान झाले होत आहे.
असे राहील तापमान व वाऱ्याचा वेग
वार तापमान डिग्री वारे ताशी किलो मीटर वातावरण
मंगळवार २८ १६ २७ ढगाळ
बुधवार २९ १४ २३ ढगाळ
गुरूवार ३१ १४ ६ थोडे ढगाळ
शुक्रवार ३२ १६ ३ सुर्यप्रकाश