घरांची पडझड, पोलिसांची धडपड !
By admin | Published: April 27, 2016 12:27 AM2016-04-27T00:27:27+5:302016-04-27T00:54:37+5:30
पोलिस वसाहतींची दुरवस्था : कुटुंबीयांचा जीव टांगणीला; के. पी. बक्षी करणार शुक्रवारी पाहणी
एकनाथ पाटील -- कोल्हापूर -पोलिसांना नवीन घरे देण्याची गृहखात्याची घोषणा फक्त कागदावर राहिली आहे. पोलिस प्रशासनाने पाठविलेल्या नवीन घरांच्या प्रस्तावावर कोणतीच हालचाल झालेली नाही. राज्याचे गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी हे शुक्रवारी (दि. २९) पोलिस वसाहतींची पाहणी करणार आहेत. नवीन घरांचे स्वप्न उराशी बाळगून संसाराची मोट बांधलेल्या पोलिसांसह कुटुंबीयांना आजही पडझड झालेल्या छोट्याखानी घरांमध्ये मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मुख्य सचिव बक्षी यांनी आमच्या कुटुंबीयांच्या वेदना जाणून घेत घरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिस वसाहतींना सध्या अवकळा प्राप्त झाली आहे. या वसाहती विविध समस्यांच्या भोवऱ्यात अडकल्याने घरे सोडून काही पोलिस भाड्याच्या घरात निघून गेले आहेत. पोलिसांच्या घरांची बिकट अवस्था पाहून गृहखात्याने पोलिसांना नवीन घरे देण्याची घोषणा यापूर्वी केली होती. त्यासाठी राज्यभरातून प्रस्तावही मागवून घेतले. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने नवीन घरांचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या स्वाक्षरीने पोलिस महासंचालकांकडे पाठविला; तेथून तो गृहखात्याकडे पाठविण्यात आला आहे; परंतु या प्रस्तावावर अद्यापही कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. इंग्रजांच्या काळात सुमारे पाच एकरात बुधवार पेठ व लक्ष्मीपुरी परिसरात पोलिसांना राहण्यासाठी १७० घरे (क्वॉर्टर्स) बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर पोलिस मुख्यालयासमोरही पोलिसांसाठी घरे उभारली आहेत.
पोलिस प्रशासनात अधिकारी १६५, कॉन्स्टेबल २५८१ असे एकूण २७४६ आहेत. अधिकाऱ्यांसाठी ४७, तर कॉन्स्टेबलसाठी १४८० अशी एकूण १५८० घरे सध्या आहेत. ही सर्व कौलारू आणि दहा बाय दहाच्या दोन खोल्या असून, यामध्ये स्वयंपाकखोली आणि बैठ्या खोलीसह आंघोळीसाठी छोटेसे बाथरूम अशी या घरांची रचना आहे. एकेकाळी ही वसाहत बहरून गेली होती. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यामुळे या वसाहतीला कॉलनीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जस-जसे पोलिसांच्या कुटुंबीयांच्या संख्येत वाढ होत गेली, तशी घरे अपुरी पडू लागली. त्यातच वसाहतीमधील समस्यांकडे पोलिस प्रशासनाने लक्ष न दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे स्वास्थ्य हरपले आहे. वाढती गुन्हेगारी, आंदोलने यामुळे पोलिसांचा कामाचा ताण वाढत आहे. घटकाभर विश्रांती घ्यायची म्हटली तरी देखील हक्काच्या घरातील अडचणींमुळे ते त्यांच्या पदरी पडत नाही. गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव बक्षी हे पोलिस वसाहतींची पाहणी करणार आहेत येथील समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या स्वागताची तयारीही पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. कित्येक वर्षांपासून छोट्याखानी घरांमध्ये मरणयातना भोगणाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न बक्षी यांनी मार्गी लावावा, अशी अपेक्षा पोलिसांतून व्यक्त होत आहे.