कोल्हापूर : येथील सावली फाउंडेशनने त्यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त ज्ञान सावली उपक्रमांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाच शाळांच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे.
महानगरपालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत. प्रत्येक भागातील गरजूंना लाभ होण्यासाठी आम्ही ज्ञान सावली हा उपक्रम सुरू केल्याचे या फाउंडेशनचे अध्यक्ष प्रथमेश सूर्यवंशी यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात फुलेवाडी रिंगरोड येथील रावबहाद्दूर विचारे विद्यामंदिर येथून करण्यात आली. या शाळेतील पाण्याची टाकी, पंखा, विजेची व्यवस्था केली. स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली. दानशूर व्यक्तींच्या मदतीतून हे काम करण्यात आले. शाळेची स्वच्छता करून चित्रांसह कलात्मक रंगरंगोटी करण्यात आली. या उपक्रमात फाउंडेशनचे सदस्य निखिल कोळी, मंगेश देसाई, तृप्ती जाधव, राजकुंवर भोसले, प्रसाद जोशी, हर्षद भोसले, विनोदकुमार भोंग, कृष्णात कुंभार सहभागी झाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
फोटो (२५०४२०२१-कोल-सावली फौंडेशन) : कोल्हापुरातील सावली फाउंडेशनच्या वतीने फुलेवाडी रिंगरोड येथील रावबहाद्दूर विचारे विद्यामंदिराची स्वच्छतेसह रंगरंगोटी करण्यात आली आहे.
वैभव पाटील यांची निवड
कोल्हापूर : मराठा कमांडो सेक्युरिटी इंटेलिजन्स व मॅॅनपॉवर फोर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि तिरपण येथील वैभव भैरू पाटील यांची वर्ल्ड ह्यूमन राइटस् प्रोटेक्शन कमिशनने डॉक्टरेट पदवीसाठी निवड केली आहे. ही पदवी त्यांना दि. ६ जून रोजी पितामपूर (दिल्ली) येथे प्रदान केली जाणार आहे. त्यांना आई सविता, वडील भैरू, पत्नी पूनम, मामा संदीप व पांडुरंग लाड, बहीण संगीता, भाऊ प्रसाद पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (२५०४२०२१-कोल-वैभव पाटील (तिरपण)
कोविड केंद्रात कॅॅमेरे बसवा
कोल्हापूर : प्रत्येक शासकीय, खासगी रुग्णालयातील कोविड केंद्रातील अतिदक्षता विभागामध्ये कॅॅमेरे बसविण्यात यावेत. त्यामुळे अतिदक्षता विभागातील उपचार हे पारदर्शी होतील. याबाबत महापालिका कार्यक्षेत्रातील संबंधित रुग्णालयांमध्ये पारदर्शी कार्यपद्धती राबविण्यात येण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख विशाल देवकुळे यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिले.
शहीद महाविद्यालयात ‘संशोधना एजन्सीज’वर वेबिनार
कोल्हापूर : तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातील बी. ए. मास मीडिया विभागातर्फे रिसर्च फंडिंग एजन्सीज या विषयावर ऑनलाइन सेमिनार घेण्यात आला. त्यात देशभरातील ८० हून अधिक शिक्षक, संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमधील डॉ. अपूर्वा बर्वे, डॉ. जगन्नाथ पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. राहुल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अहिल्या पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. दिग्विजय कुंभार यांनी केले. प्राचार्य प्रशांत पालकर यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.