आयुक्तांकडून फेरीवाला झोनचे चुकीचे नियोजन

By admin | Published: February 24, 2016 01:01 AM2016-02-24T01:01:13+5:302016-02-24T01:01:13+5:30

मुरलीधर जाधव : पुनर्वसन करताना नगरसेवकांना विश्वासात घ्या

Commissioner's wrong planning of hawkers zones | आयुक्तांकडून फेरीवाला झोनचे चुकीचे नियोजन

आयुक्तांकडून फेरीवाला झोनचे चुकीचे नियोजन

Next

कोल्हापूर : शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी करणारे आयुक्त पहिल्यांदाच पाहतोय, अशा शब्दांत स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी मंळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांनी बैठक बोलाविली असताना आयुक्त बैठकीस येणार नसतील तर आम्ही कोणाकडे तक्रार करायची, अशी विचारणाच उपमहापौर शमा मुल्ला यांनी या बैठकीत केली.
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनर्वसन जर स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन करणार नसाल तर ते कदापि यशस्वी होऊन देणार नाही, असा इशाराच प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना आता आणखी खीळ बसली.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे यांनी मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका ताराराणी सभागृहात प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते; परंतु आयुक्तांनी या बैठकीला दांडी मारली. काही मोजकेच अधिकारी यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्यांनी शहरातील पर्यायी जागांचा शोध घेऊन पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला ते संजय भोसलेही या बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे सर्वच पदाधिकारी, नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदविला.
गेली वर्षभर ही पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असूनही त्यात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले नाही. परिणामी प्रशासनाचे नियोजन चुकले आहे. शहरात सर्वत्र टीका, विरोध होत असून नगरसेवकांना जबाबदार धरले जाऊ लागले आहे. त्यामुळे यापुढे नियोजन करताना जर नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही तर ते कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराच या बैठकीत देण्यात आला.
प्रशासनाच्या नियोजनावर बैठकीत टीकेची झोड उठविण्यात आली. ज्या भागात चार-चार शाळा आहेत, निवासी परिसर आहे, अशा ठिकाणी फेरीवाल्यांना जागा कशासाठी देता, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली. एकीकडे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून जाहीर करायचे तर दुसरीकडे त्याच ताराबाई रोड व महाद्वार रोडवर विक्रेत्यांना जागा कशी काय दिली जाते, अशी विचारणा ईश्वर परमार यांनी केली. सांगली-मिरज परिसरातील विक्रेते कोल्हापुरात येऊन व्यवसाय करतात, त्यांच्याकडे बायोमेट्रीक कार्ड आहेत का याची तपासणी करावी, अशी मागणी दुर्वास कदम यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, शारंगधर देशमुख, सुनील पाटील, अजित ठाणेकर, तौफिक मुल्लाणी, मधुकर रामाणे आदींनी चर्चेत भाग घेतला.
तक्रार तरी कोणाकडे करायची?
आयुक्त पी. शिवशंकर यांनी बैठकीस दांडी मारल्यामुळे उपमहापौर शमा मुल्ला चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. नागरिक आमच्या दारात येतात. त्यामुळे आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. जर आयुक्त प्रत्येक वेळी पदाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीला गैरहजर राहणार असतील आणि प्रत्येक वेळी असेच होणार असेल तर मग आम्ही तक्रार तरी कोणाकडे करायची, अशी विचारणाच त्यांनी बैठकीत केली.

Web Title: Commissioner's wrong planning of hawkers zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.