गडहिंग्लज :
गेल्या आठ दिवसांपासून पूर्णत: लॉकडाऊनमुळे सन्नाटा पसरलेल्या शहरवासीयांना आज (सोमवारी)पासून सकाळी ७ ते ११ कांही प्रमाणात शिथिलता देण्यात आली; मात्र कोरोना नियमांचे काटेकोर पालन व अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडण्याच्या सूचनांचे पालन नागरिकांनी करून मिनी अनलॉकला पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद दिला.
आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी खेड्यातून येणारे भाजीपाला व दूध विक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवेश देण्यात आला.
पालिका व पोलीस प्रशासनाने शहराव्यतिरिक्त खेड्यातील नागरिकांना मंगळवार (२५) प्रवेश बंदीचा निर्णय घेतला होता; मात्र नाकाबंदी ही केवळ नावालाच असल्याचे दिसून आले.
बाजारपेठेत नागरिक केवळ अत्यावश्यक व गरजेच्या वस्तू खरेदी करताना दिसले. शहरातील लक्ष्मी रोड, नेहरू चौक, कडगाव रोड, मुलींचे हायस्कूल परिसर व संकेश्वर रोड अशा विविध भागात भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे गर्दी नियंत्रणात होती.
यापुढेही किराणा दुकाने सकाळच्या सत्रात सुरू राहणार असल्याने किराणा माल खरेदीसाठी गर्दी करणे नागरिकांनी टाळले.
पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सहकाऱ्यांसमवेत शहरातून पायी फिरून मेडिकल, किराणा व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून अन्य दुकाने उघडी नसल्याची पाहणी केली.
अकरानंतर पुन्हा सर्व व्यवहार बंद झाल्याने शहरात शुकशुकाट पहायला मिळाला.
-----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे मिनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी असे सुरक्षित अंतर ठेवत किराणा साहित्य खरेदी केले. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : २४०५२०२१-गड-०५