मिलीग्रॅम वजनकाट्याला सक्ती की स्थगिती
By admin | Published: March 31, 2015 11:43 PM2015-03-31T23:43:39+5:302015-04-01T00:03:24+5:30
आज होणार स्पष्ट : सराफ व्यावसायिकाचे लक्ष
कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने शासनाने आज, बुधवारपासून सक्ती केलेल्या एक मिलीग्रॅमच्या काट्याला कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी विरोध केला. मात्र, शासनाने अद्याप त्यावर निर्णय दिला नसल्याने या सक्तीवर स्थगिती आणली जाईल की सराफ व्यावसायिकांवर कारवाई होईल, हे चित्र स्पष्ट झालेले नाही.
एक मिलीग्रॅमच्या काट्यात हवेच्या एका झुळुकनेसुद्धा फरक पडतो शिवाय सद्याच्या वजनकाट्यांचे करायचे काय, त्याचे नुकसान कोणी सोसायचे, या कारणात्सव सराफ व्यावसायिकांचा या काट्याला विरोध आहे. सध्या असलेल्या एक ग्रॅमच्या काट्यामुळे ग्राहकांचे १० ते २५ रुपयांपर्यंत नुकसान होते हे टाळण्यासाठी शासनाने एक मिलीग्रॅमच्या काट्याला सक्ती केली.
जिल्हा सराफ व्यापारी संघासह शहरातील विविध सराफ व्यावसायिक संघटनांनी आमदार अमल महाडिक यांना निवेदन देऊन या वजनकाट्याच्या सक्तीला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. मात्र, अजूनही शासनाने पाऊल उचलले नाही. त्यामुळे आजपासून सराफांवर कारवाई होणार की सक्तीला स्थगिती मिळणार याचे चित्र स्पष्ट होईल. सक्ती केली तर आंदोलन करू, असा इशारा सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी दिला आहे.