समीरच्या विरोधात ८ मार्चला दोषारोप निश्चित

By admin | Published: February 24, 2016 01:03 AM2016-02-24T01:03:23+5:302016-02-24T01:03:23+5:30

तपास असमाधानकारक : पानसरे कुटुंबीयांची खंत; खटला तहकूब करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार : मेघा पानसरे

Confirmation on March 8 against Sameer | समीरच्या विरोधात ८ मार्चला दोषारोप निश्चित

समीरच्या विरोधात ८ मार्चला दोषारोप निश्चित

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला अन्यत्र चालविण्याचा मुद्दा निकालात निघाला आहे; त्यामुळे आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात मंगळवार, दिनांक ८ मार्चला दोषारोप निश्चित करून सुनावणीला सुरुवात केली जाईल, असे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांनी मंगळवारी स्पष्ट केले. दरम्यान, एकूणच पानसरे हत्येप्रकरणी जो तपास झाला आहे, त्याबाबत पानसरे कुटुंबीय असमाधानी आहेत. त्यामुळे या खटल्याची सुनावणी स्थगित करावी, यासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे फिर्यादीचे वकील अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने हा खटला तहकूब केला नाही तर ८ मार्च रोजीच दोषारोप निश्चित करून सुनावणी सुरू केली जाणार आहे.
पानसरे खटल्याची सुनावणी मंगळवारी दुपारी तीन वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बिले यांच्या दालनात सुरू झाली. सुरुवातीस आरोपीचे वकील एस. व्ही. पटवर्धन यांनी समीर गायकवाड याच्यावरील आरोप निश्चित करावेत आणि सुनावणीस सुरुवात करावी, अशी मागणी केली. त्यावर फिर्यादीचे वकील अ‍ॅड. घाटगे यांनी फिर्यादीचे म्हणणे असे आहे की, पानसरे हत्येप्रकरणी ह्या न्यायालयासमोर जो काही पुरावा आला आहे, तो समाधानकारक नाही. हा तपास खुला ठेवला आहे. जोपर्यंत आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा होत नाहीत तोपर्यंत या खटल्याची सुनावणी होऊ नये.
खटल्याची सुनावणी तहकूब करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. त्यासाठी आम्हाला मुदत द्यावी, अशी विनंती केली. त्यावर न्यायाधीश बिले यांनी या खटल्याची सुनावणी कोल्हापूर सोडून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या जिल्ह्णांत व्हावी, अशी आरोपी गायकवाड याची मागणी उच्च न्यायालयाकडे होती; परंतु त्याच्या वकिलांनी ही याचिका मागे घेतली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्याने आरोपीविरोधात ८ मार्च रोजी दोषारोपपत्र निश्चित करून खटल्याच्या सुनावणीला सुरुवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पानसरे कुटुंबीयांना खटल्याला स्थगिती घेण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी मिळाला आहे. यावेळी सरकारी वकील चंद्रकांत बुधले, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख, मेघा पानसरे, दिलीप पोवार, अ‍ॅड. प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते.
साक्षीदारांचा अहवाल सादर
पानसरे दाम्पत्यावर हल्ला होताना शाळकरी मुलाने पाहिले आहे. तो या खटल्यातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने ओळख परेडमध्ये आरोपी समीर गायकवाड याला ओळखले आहे. हल्ल्याची सर्वप्रथम माहिती त्याने वर्गातील शिक्षिका व वर्गमित्राला सांगितली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या शिक्षिकेसह मित्राचा लेखी जबाब घेतल्याचा अहवाल मंगळवारी न्यायाधीश बिले यांना सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली समीरची भेट
समीर गायकवाड याची जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दि. १७ फेब्रुवारीला कळंबा कारागृहात भेट घेतली. यावेळी त्यांनी त्याला ‘तुझी काही तक्रार आहे का?’ अशी विचारणाही केली. त्याने ‘काही नाही, मी चांगला आहे,’ असे सांगितले होते. तसेच तो कोणती पुस्तके वाचतो, याचीही माहिती डॉ. सैनी यांनी घेतली. हा भेटीचा अहवालही न्यायालयास सादर करण्यात आल्याचे अ‍ॅड. घाटगे यांनी सांगितले.
‘अंडा सेल’मधून बाहेर नाही
कारागृह प्रशासनाने न्यायालयास सादर केलेल्या अहवालामध्ये समीर याला सकाळी सहा ते सात व दुपारी १२ ते ३ या वेळेत अंडा सेलमधून बाहेर काढले जाते. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या पत्रामुळे त्याची सुरक्षितता धोक्यात आहे. त्याच्या सुरक्षिततेमुळे त्याला अंडा सेलमधून बाहेर काढता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यावर न्यायाधीश बिले यांनी समीरला सकाळी सहा ते नऊपर्यंत अशा वाढीव दोन तासांसाठी बाहेर काढण्यासाठी मुभा दिली.
तुरुंगाधिकाऱ्यांसह
कर्मचाऱ्यांना शिवीगाळ
कारागृहातील अंडा सेलमध्ये मुंबई पश्चिम रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील मोहंमद साजीद अन्सारी, मुझ्झमिल रहमान शेख यांच्यासह उजळाईवाडी खून प्रकरणातील आरोपी लहू ढेकणे यांना ठेवले आहे. या तिघांना अंडा सेलमधून बाहेर काढले जाते. समीरची एकट्याचीच वेळ स्वतंत्र ठेवली आहे. अन्य आरोपींसोबत आपणालाही बाहेर काढावे, यासाठी त्याने कारागृहातील तुरुंगाधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्याच्या याही गैरवर्तनाची दखल प्रशासनाने घेत न्यायालयास अहवाल सादर केला.

Web Title: Confirmation on March 8 against Sameer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.