‘त्या’ वाघाच्या कातड्याबाबत संभ्रम
By admin | Published: April 1, 2015 12:26 AM2015-04-01T00:26:16+5:302015-04-01T00:31:17+5:30
आजऱ्यातील प्रकार : कातडे बनावट; सिंंधुुदुर्ग वनविभागाचा दावा
सावंतवाडी : आजरा येथे २२ फेब्रुवारीला पकडलेले वाघाचे कातडे बनावट असल्याचे पुढे आले आहे. हे कातडे पकडल्यानंतर अधिक तपासणीसाठी मुंंबईतील फॉरेन्सिक लॅबला पाठविले होते. सिंधुुदुर्ग वनविभागाने कातडे बनावट असल्याबाबत दुजोरा दिला आहे. मात्र, आजरा वनविभाग, तसेच पोलिसांनी आपल्याकडे कातड्याबाबत अहवाल आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कातड्याबाबत संभ्रम अधिकच वाढला असून, म्हैसूरमधून ज्या व्यापाऱ्याकडून संशयितांनी कातडे घेतले, त्या व्यापाऱ्यानेही रंग काढून अशी कातडी विकतो, असा जबाब दिला आहे. आजरा येथे गेल्या महिन्यात हॉटेलमध्ये वाघाचे कातडे विकताना सिंधुुदुर्गातील सहाजणांना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी हा व्यवहार पाच लाखाला ठरल्याचे त्यांच्या बोलण्यातून पुढे आले होते. मात्र, आजरा पोलिसांनी कातड्याचा तपास केला, तेव्हा प्रकरणाची व्याप्ती म्हैसूरपर्यंत गेली होती. म्हैसूर येथील व्यापाऱ्याने हे कातडे कुडाळ तालुक्यातील पावशीतील ग्राहकाला दोन वर्षांपूर्वी दोन हजार रुपयांना विकले होते. त्याने शिवापूर येथील अरुण कदम याला आपल्याकडे कातडे असून, गिऱ्हाईक शोध असे सांगितले होते. किरण सावंत, अशोक राऊळ, आदींनी कलंबिस्त ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचे मूळ गाव आजरा येथील असल्याने त्यांच्या मदतीनेच ग्राहक शोधला, पण हा ग्राहक बनावट निघाला. त्यांनी कातडे घेऊन सर्वांना आजरा येथे बोलावले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर आजरा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, त्यांनी म्हैसूर येथील व्यापाऱ्याकडून कातडे घेतल्याचे समजताच त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने हे कातडे बनावट असून, आम्ही कातड्यांना रंग देऊन ते बाजारात विकतो, असे सांगितले. पोलिसांनी कातडे फॉरेन्सिक लॅबला पाठविले होते. अहवाल प्राप्त झाला नसताना सिंधुदुर्ग वनविभागाने कातडे बनावट असल्याबाबत शिक्कामोर्तब केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.