सौंदत्तीतील रेणुका यात्रेबाबत भाविकांत संभ्रम, यात्रेचा कार्यक्रम अद्याप जाहीर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 02:23 PM2021-11-20T14:23:03+5:302021-11-20T14:24:27+5:30
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर परिसरातील लाखो भाविकांना रुखरूख लागली आहे. ...
कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर परिसरातील लाखो भाविकांना रुखरूख लागली आहे. यंदा यात्रा होणार असल्याचे रेणुका देवस्थान समितीकडून तोंडी सांगण्यात आले असले तरी एक महिन्यावर यात्रा येऊनही यात्रेचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
सौंदत्ती येथील कानडी आई रेणुका देवी यांचे लाखो भाविक कोल्हापूर, सांगली परिसरात आहेत. डिसेंबर महिन्यात सौंदत्ती येथे भरणाऱ्या यात्रेस भाविक श्रद्धेने सौंदत्तीला जात असतात. यात्रेचा कार्यक्रम तीन दिवस असतो. त्याची सुरवात दिवाळी झाली की सुरू होते. यापूर्वी २०१९ मध्ये यात्रा भरली होती. २०२० मध्ये ही यात्रा कोरोना संसर्गामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने स्थगित केली. दोन वर्षांत भाविकांना देवीचे दर्शन झाले नाही. भाविक यंदा तरी यात्रा होणार की नाही, यात्रेला जायला मिळणार की नाही, या विवंचनेत आहेत.
रेणुका देवस्थान व्यवस्थापन समिती, सौदत्ती यांच्या कार्यालयातून कोरोना संबंधीचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे यंदा यात्रा होणार असल्याचे तोंडी सांगण्यात येते. परंतु जिल्हा प्रशासनाने यात्रा होणार की नाही आणि होणार असेल तर त्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळेच भाविकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
कोल्हापूर परिसरातील भाविक यात्रेबाबत कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेकडे चौकशी करीत आहेत. संघटनेनेही देवस्थानकडे चौकशी केली. देवीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. त्यामुळे यात्रा होईल, परंतु यात्रेचा कार्यक्रम जाहीर झालेला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत असल्याचे भक्त संघटनेचे अध्यक्ष अच्युतराव साळोखे यांनी सांगितले. यात्रा आजपासून एक महिन्यावर आली आहे, तरीही कार्यक्रम जाहीर झालेला नाही. बेळगाव जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशनही होणार आहे. त्यामुळे यात्रेला कधी परवानगी मिळते हे बघावे लागेल, असे साळोखे म्हणाले.
भाडे ठरविण्यातही अडचणी-
कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे. यात्रेसाठी एसटी भाडे किती आकारले जाणार, हेही भक्त संघटनेला कळालेले नाही. त्यामुळे भाविकांना किती खर्च येणार याबाबतही स्पष्टता झालेली नाही. म्हणूनच सोमवारी सकाळी विभाग नियंत्रकांना याबाबत भेटणार आहोत, असे अच्युत साळोखे यांनी सांगितले.