निपाणी : कर्नाटक शासनाने गणेशोत्सवावर अनेक निर्बंध घातले होते. यानंतर निपाणी तालुक्यातील गणेश मंडळांनी एकत्र येऊन गणेशोत्सव उत्साहात व निर्बंध झुगारून करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर सर्व गणेश मंडळांनी एकत्र येत गणेश महामंडळाची स्थापना केली होती. कर्नाटक शासनाने सार्वजनिक गणेश मूर्तींचे पाचव्यादिवशी विसर्जन करावे, असे सांगितले आहे; पण गणेश उत्सव मंडळांनी सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन परंपरेनुसार करणार, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे पोलीस व मंडळ कार्यकर्ते यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बेळगाव येथील गणेशोत्सवाची परंपरा लक्षात घेता, सार्वजनिक गणेश मंडळांना दहा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याबद्दल कोणताही आदेश स्थानिक प्रशासनाला नसल्याने निपाणी तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री मूर्ती पाचव्यादिवशी विसर्जन करावी, असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे. गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वीच बसवेश्वर पोलीस स्थानकात बैठक घेऊन पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना नियम व अटी समजावून सांगितल्या आहेत; पण यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाचव्यादिवशी विसर्जनाला आक्षेप घेतला आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
...................
पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाचव्यादिवशी विसर्जन करण्याचे सांगितले आहे; पण एकादिवशी विसर्जन करणे शक्य नाही. त्यामुळे परंपरेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
ॲड. नीलेश हत्ती,
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ