दहशतवादी संघटनांशी लागेबांधे! कोल्हापूर, इचलकरंजी, हुपरीत ‘एनआयए’चे छापे: तिघे संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:27 AM2023-08-14T11:27:50+5:302023-08-14T11:28:28+5:30
संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त
कोल्हापूर : दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या पथकांनी शनिवारी (दि. १२) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील काही महत्त्वाची कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पथकांनी जप्त केल्या. कोल्हापूर आणि नाशिकसह देशात पाच राज्यांतील १४ ठिकाणी छापे टाकल्याचे एनआयएने रविवारी जाहीर केले. या कारवाईमुळे कोल्हापुरातील संशयितांचे दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे समोर येत आहेत.
एनआयएच्या रेकॉर्डवरील दोन दहशतवादी पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर दहशतवाद्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील वावर तपासातून समोर येत आहे. एनआयएच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील १४ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक येथे टाकलेल्या छाप्यांमधून महत्त्वाची माहिती पथकांच्या हाती लागली. यात संशयास्पद कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे यासह मोबाइल, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून तीन संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. यातील दोघे ३० ते ३५ वयोगटातील आहेत, तर एक अंदाजे ४५ वर्षे वयाचा आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीयरीत्या करण्यात आली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना दिली नाही. कारवाई करून पथके परतल्यानंतरच याची माहिती एनआयएने जाहीर केली.
याबाबत पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'एनआयए, एटीएस किंवा आयबी अशा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असतात. ते अधिकारी गरज असेल तरच स्थानिक पोलिसांची मदत घेतात. एनआयएने जाहीर केलेल्या प्रेसनोटशिवाय शनिवारी जिल्ह्यात झालेल्या कारवायांबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.'
इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा अजेंडा
संशयितांकडे मिळालेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती एनआयएच्या हाती लागली. या कागदपत्रांनुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय ही दहशतवादी संघटना २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा अजेंडा घेऊन काम करीत आहे. त्यासाठी पीएफआय आर्मी तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
कोल्हापुरात स्लीपर सेल ॲक्टिव्ह?
गेल्या आठ-दहा वर्षांत सातत्याने कोल्हापुरातील काही संशयितांचे दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असल्याचे समोर येत आहे. गेल्या वर्षी सुभाषनगर येथून एका तरुणाला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले होते. पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांनी कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांच्या चाचण्या केल्याचे समोर आले. त्यामुळे कोल्हापुरात दहशतवादी संघटनांचा स्लीपर सेल ॲक्टिव्ह आहे काय, अशी शंका बळावली आहे.