अतुल आंबी - इचलकरंजी -देशभरातील राज्यांमध्ये विविध समाजामध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने नियोजन कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये इचलकरंजीतील कंजारभाट समाजाच्या बोलीभाषेची माहिती घेऊन चित्रीकरण करण्यात आले आहे. देशाच्या भाषा विभागांमध्ये या बोलीभाषेचे नियमित स्वरुपात जतन करून ठेवण्यात येणार आहे.भारत सरकार गृहमंत्रालय व नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांचे संयुक्तपणे मातृभाषा २०१५ अंतर्गत हे काम सुरू आहे. एक वर्षामध्ये आतापर्यंत ३६ भाषांची माहिती मिळाली असून, २०११ साली झालेल्या बोलीभाषांच्या जनगणनेमध्ये कंजारभाट समाजाच्या भाषेचाही समावेश होता. या भाषेचे लोक संख्येने इचलकरंजीमध्ये जास्त असल्याने येथील त्या समाजातील नागरिकांकडून ही भाषा समजावून घेतली जात आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले पुरूष व स्त्री, तसेच ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे पुरूष व स्त्री यामध्ये अजित मिणेकर, विष्णूपंत नेतले, मोहन नवले, सलोनी मिणेकर, विश्वनाथ माच्छरे, बबिता नवले, शिवानी नवले यांच्याकडून भाषेतील १५५७ शब्द, ५२५ वाक्य घेऊन १२ ते १५ शब्दांची गोष्टही तयार करण्यात येते. त्याचे हिंदी व इंग्रजीमध्ये जतन करून ठेवण्याचे काम सुरू आहे. भविष्यात ही भाषा लोप पावली, तर या समाजातील तरुणांना, तसेच देश-विदेशातील आणखीन काही व्यक्तींना अशा बोलीभाषांचा भविष्यात अभ्यास करता यावा, या उद्देशाने देशातील प्रत्येक राज्यांमध्ये जाऊन तेथील वेगवेगळ्या समाजाच्या बोलीभाषांचे जतन करण्याचे काम या विभागाच्यावतीने सुरू आहे. याबाबत सांख्यिकी अन्वेषक ग्रेड - २ दीपक बाळकृष्ण कामटेकर व प्रकाश नाथ महाडिकही हे काम पाहत आहेत. त्यांना संदीप जेरे, सुभाष देशपांडे, गुंडा हाताळगे, प्रशांत रसाळ या स्थानिकांचे सहकार्य लाभले.मोची, कैकाडी, मांगेरी, वडर, मांदेली, घिताडी, भल्लार अशा भाषांची माहिती घेण्यात आली असून, उर्वरित भाषांचीही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सर्व बोलीभाषा हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये दुभाजकाच्या सहकार्याने व्हिडीओ चित्रीकरण करून सीडीमध्ये उपलब्ध करून ठेवण्यात येणार आहेत. या सीडीमध्ये भाषा बोलणाऱ्याचे हावभाव, कंठातून शब्द फुटताना होणाऱ्या हालचाली याचेही चित्रीकरण स्पष्टपणे दिसून येणार आहे.
कंजारभाट समाजाच्या बोलीभाषेचे होणार जतन
By admin | Published: November 04, 2015 10:14 PM