विरोध मोडून बांधकाम सुरू, वातावरण तणावपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:43 PM2019-06-01T18:43:04+5:302019-06-01T18:48:27+5:30
महानगरपालिका यंत्रणेला सिद्धार्थनगरातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. तेथील नागरिकांचा विरोध मोडून काढत प्रशासनाने काम सुरू केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेऊन परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला.
कोल्हापूर : येथील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार शनिवारी उत्तरेकडील बाजूच्या भिंतीच्या तसेच तेथूनच १० फुटांवर नवीन प्रवेशद्वार तयार करण्याच्या कामास गेलेल्या महानगरपालिका यंत्रणेला सिद्धार्थनगरातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.
नागरिकांचा विरोध मोडून काढत प्रशासनाने काम सुरू केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेऊन परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला.
नर्सरी बागेजवळ शाहूप्रेमी आणि आंबेडकरप्रेमी समोरासमोर उभे ठाकल्यामुळे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंबेडकरप्रेमी कार्यकर्त्यांशी सुमारे तासभर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. नवीन प्रवेशद्वाराचे काम जेसीबी लावून करीत असताना महापालिका पदाधिकाऱ्यांनी संरक्षक भिंतीचे कामही सुरू झाले पाहिजे, असा आग्रह धरला. त्याच वेळी आमदार राजेश क्षीरसागर शिवसैनिकांसह तेथे आले. शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाल्याने एकच गोंधळ उडाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.
मात्र पोलीस बंदोबस्तात महापालिका यंत्रणेने महापौर सरिता मोरे, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते संरक्षक भिंतीच्या कामाचा प्रारंभ केला. यावेळी राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली. सिद्धार्थनगरातील पुरुषांबरोबर महिलाही मोठ्या संख्येने विरोध करण्याकरिता आल्या होत्या; तर बांधकाम सुरू झालेच पाहिजे, म्हणून महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आमदार क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.
पोलिसांनी संयमाने महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एका बाजूला, तर आंबेडकरप्रेमींना दुसऱ्या बाजूला नेल्याने परिस्थिती आटोक्यात आली. भिंतीचे काम पूर्ण होईपर्यंत महापौर मोरे, आमदार क्षीरसागर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधिस्थळाजवळ ठाण मांडले, तर आंबेडकरप्रेमींनी नजीकच्या समाजमंदिरात ठिय्या मांडला.
शनिवारी सकाळी महापौर मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, माजी महापौर हसिना फरास, आदिल फरास, नंदकु मार मोरे, दिलीप देसाई, अजित सासने, वसंतराव मुळीक यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आपली महापालिकेची यंत्रणा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करण्याकरिता नर्सरी बागेत पोहोचले. त्यावेळी तेथे सिद्धार्थनगरातील नागरिक आधीच जमले होते.
जेथे भिंती घालण्यात येणार आहे तेथे महापौरांसह सर्वांनी जाऊन ठेकेदारास काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी सिद्धार्थनगरातील नागरिकांनी थेट विरोध केला. येथे भिंत घालू नका. आमचा त्याला विरोध आहे, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे तणाव वाढू लागला. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सिद्धार्थनगरातील संजय माळी, वसंत लिंगनूरकर, देवदास बानकर यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांना शेजारच्या समाजमंदिरात नेले. तेथे त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली.
दुपारी साडेबारा वाजता अमृतकर बाहेर आले. तोपर्यंत महापालिकेचे सर्व पदाधिकारी भिंतीच्या कामाच्या ठिकाणी आले. प्रवेशद्वाराचे काम सुरू करावे आणि संरक्षक भिंतीचे काम दोन दिवसांनी समन्वय बैठक घेऊन सुरू करावे, अशी सिद्धार्थनगरातील नागरिकांची विनंती असल्याचे अमृतकर यांनी सांगितले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही कामे एकाच वेळी सुरू करावीत, असा आग्रह आमदार क्षीरसागर यांनी धरला.
एकीकडे प्रवेशद्वाराचे काम सुरू झाले तर दुसरीकडे भिंतीचे काम सुरू करण्याकरिता पुढे जात असताना धक्काबुक्की, ढकलाढकली सुरू झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांपासून दूर केले. अखेर पोलीस बंदोबस्तात भिंतीचे काम सुरू झाले. महापौर मोरे यांनी भिंतीचा पहिला दगड रचला, तेव्हा घोषणाबाजी सुरू झाली. महापालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
दडपशाही करून बांधकाम केल्याचा आरोप
सिद्धार्थनगरातील नागरिकांवर दडपशाही करून संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू केल्याचा आरोप वसंत लिंगनूरकर व संजय माळी यांनी केला. पोलीस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी दोन दिवसांनी बैठक घेऊन वादग्रस्त भिंतीबाबत निर्णय घेण्याची विनंती केली असताना, बळाचा तसेच दडपशाहीचा वापर करून बांधकाम सुरू केले. दोन दिवस थांबलो असतो तर काय आकाश कोसळणार होते का, असा सवालही या दोघांनी उपस्थित केला.
जिल्हाधिकाऱ्यांचा अवमान नको
शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तोडगा काढला होता. संरक्षक भिंतीचे काम सुरू करीत असताना सिद्धार्थनगरातील नागरिकांकरीरिता १० ते १५ फूट अंतरावरून एक प्रवेशद्वार करायचे ठरले होते. त्याप्रमाणे काम सुरू करण्यास गेल्यावर महापालिकेच्या यंत्रणेला विरोध करणे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा अवमान आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मान्य करायचे आणि बाहेर आल्यावर पुन्हा विरोध करायचा, ही भूमिका योग्य नाही, अशा शब्दांत उपमहापौर भूपाल शेटे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
बांधकामाला धक्का लागल्यास काहीही घडेल
राजर्षी शाहू समाधिस्थळ चारी बाजूंनी बंदिस्त असणे सुरक्षितता आणि पावित्र्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. दुसºया बाजूने एक प्रवेशद्वार करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर हा वाद मिटला होता. तरीही मोजके पुढारी भिंतीच्या कामास विरोध करीत आहेत. आता केलेल्या बांधकामाला जर का धक्का लागला तर काहीही घडेल, असा इशारा राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिला. पोलीस प्रशासनाने आता खबरदारी घेऊन, विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना नोटिसा लागू कराव्यात किंवा काही घडले तर त्यांना जबाबदार धरावे, अशी मागणीही त्यांनी केली.
रक्त सांडले तर बेहत्तर, पण मागे हटणार नाही
महापौर सरिता मोरे सकाळी १०.३० वाजता समाधिस्थळाजवळ पोहोचल्या. त्यावेळी पुरेसे पोलीसही तेथे नव्हते. जेथे संरक्षक भिंती उभी करायची होती, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली. तेव्हा सिद्धार्थनगरातील काही महिलांनी महापौरांना विरोध करीत आम्ही येथे भिंत घालू देणार नाही, असे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महापौर मोरे यांनीही तितक्याच त्वेषाने ‘शाहू महाराजांच्या समाधीसाठी रक्त सांडले तर बेहत्तर, पण मागे हटणार नाही,’ असे ठणकावून सांगितले.
सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना
संरक्षक भिंतीचे काम कोणत्याही परिस्थितीत सायंकाळपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेच्या प्रशासनाने केला; परंतु दुसरीकडे काही महिलांनी रात्रीत भिंतीचे काम पाडण्याचा इशारा दिला. याची कुणकुण लागताच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी समाधिस्थळाचा परिसर तसेच जेथे शनिवारी बांधकाम केले त्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या. त्याची तत्काळ अंमलबजावणीही सुरू झाली.