बांधकाम नियमावलीचा कोल्हापूरला फटका !
By Admin | Published: September 22, 2016 01:08 AM2016-09-22T01:08:06+5:302016-09-22T01:08:06+5:30
नवीन नियमावली मंजूर : शहराच्या विकासावर मर्यादा
कोल्हापूर : राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिका हद्दीकरिता बांधकामविषयक नवीन विकास नियंत्रण नियमावलीला राज्य सरकारने बुधवारी मंजुरी दिली. या नियमावलीमुळे कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील छोटे क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींच्या विकासावर मर्यादा येणार आहेत. आधीच शहर हद्दवाढीला ‘खो’ बसला, आता उभ्या विकासालाही या नियमावलीचा फटका बसणार आहे.
महानगरपालिका हद्दीत पाच हजार चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्राचे प्लॉटधारक आहेत, अशांना या नवीन नियमावलीचा काहीही उपयोग होणार नसल्याचे सांगण्यात येते. वीस हजार फुटांपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या प्लॉटधारकांना सध्या पस्तीस फुटांपर्यंत इमारतींचे बांधकाम करता येत होते, आता ते पन्नास फुटांपर्यंत करता येईल. ज्यांना सध्या एक एफएसआय आहे, त्यांना ०.१० वाढीव एफएसआय मिळणार आहे. ज्या प्लॉटना नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता आहे, त्यांना पेडअप व टीडीआर मिळणार नाही. कोल्हापुरात अशाप्रकारच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मिळकती आहेत. कोल्हापूर शहरातील बहुतांशी रस्ते सहा ते साडेसात मीटर रुंदीचे आहेत. त्यामुळे अशा मिळकतींना नवीन नियमावलीचा फायदा मिळणार नाही. पूर्वी गावठाण हद्दीत सेटबॅक नव्हता परंतु आता २५० चौ. मीटर क्षेत्रावरील प्लॉटना सेटबॅक लागणार आहे. १६ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या मिळकतींना स्वतंत्र निकष असणार आहेत. त्यांना सामासिक अंतर सोडावे लागणार आहे. पाच हजार चौरस फूट क्षेत्राचे प्लॉटधारक आहेत त्यांना कमी प्रमाणात लाभ होईल. त्यांना सामासिक अंतर सोडावे लागणार असल्याने बांधकाम क्षेत्र कमी होणार आहे. मोठ्या गृहप्रकल्पांना या नियमावलीचा फायदा होणार आहे. विशेषत: ज्या मिळकतींचा आकार व समोरील रस्ता मोठा आहे त्यांना त्याचा फायदा होईल. शंभर फुटी रस्त्याला लागून असलेल्या मिळकतींना १.१० हा बेसिक एफएसआय असेल, त्यावर १.४० टीडीआर अधिक ३० टक्के पेडअप असा मिळून २.८० एफएसआय मिळू शकेल. मोठ्या क्षेत्रातील प्लॉटधारकांना या नियमावलीचा फायदा होणार असून त्यामुळे बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येतील येतील, असे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)