पाणी, ड्रेनेज योजनेची कामे पावसाळ्यातही सुरूच ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:39+5:302021-07-14T04:29:39+5:30
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पावसाळ्यात जी कामे सुरू ठेवता येणे शक्य आहे, ती कामे सुरू ठेवून ती ...
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची पावसाळ्यात जी कामे सुरू ठेवता येणे शक्य आहे, ती कामे सुरू ठेवून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवारी दिल्या.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना, अमृत अभियानांतर्गत कोल्हापूर शहर पाणीपुरवठा योजना आणि मलनि:सारण योजनेचा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आढावा घेतला. तेव्हा त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता अजय साळुंखे, जल अभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपअभियंता डी. के. पाटील, शाखा अभियंता भास्कर कुंभार, आर. के. पाटील, संजय नागरगोजे, जी.के.सी.चे राजेंद्र माळी, दास ऑफशोअर इंजि प्रा. लि.चे प्रशांत पाटील, नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे अविनाश मदने, युनिटी कन्सल्टंटचे विजय मोहिते उपस्थित होते.
थेट पाईपलाईन योजनेच्या ब्रेक प्रेशर टँकचे काम सुरू असून ६६ मीटर लांबीच्या पुलाचे काम सुरू आहे. पनोरी येथील गॅप क्लोझिंगचे काम सुरू असून विद्युतवाहिनी टाकण्याचे काम १० किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. ३३ केव्ही उच्चदाब विद्युतवाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
मलनि:सारण योजनेअंतर्गत नाले अडविणे व वळविणे, ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम, दुधाळी ६ द.ल.लि. व बावडा ४ द.ल.लि. एसटीपीची कामे प्रगतिपथावर असून पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता डी. के. पाटील यांनी सांगितले.