सावधान! भटक्या श्वानांमध्ये आला कोरोना कॅनाइन डिस्टेंपर, कोल्हापुरात पंधरा दिवसांत अनेक श्वानांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 02:11 PM2024-01-30T14:11:33+5:302024-01-30T14:11:46+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात भटक्या श्वानांमध्ये सध्या कॅनाइन डिस्टेंपर या कोरोनासारख्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. गेल्या १५ ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात भटक्या श्वानांमध्ये सध्या कॅनाइन डिस्टेंपर या कोरोनासारख्या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. गेल्या १५ दिवसांतच रस्त्यावरील अनेक भटक्या श्वानांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचे प्राणिमित्र धनंजय नामजोशी यांनी सांगितले.
श्वानांमध्ये या आजाराची सर्दी किंवा ताप हे प्राथमिक लक्षणे आहेत. सर्दी तापानंतर न्यूमोनिया होऊन श्वान दगावत आहेत. खोकला आणि तोंडातून रक्त पडणे असे प्रकार श्वानांमध्ये आढळत आहेत. सर्दी, तापामुळे श्वास घेण्यात अडचणी येतात. परिणामी, अंग थरथर कापत असल्याची लक्षणे श्वानांमध्ये आढळत आहेत.
पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. अनिल पाटील व डॉ. राहुल पोवार यांच्याकडे अशा प्रकारची लक्षणे असलेले अनेक श्वान आणले जात आहेत. त्यांच्याकडे तपासणीसाठी आणलेल्या १३ श्वानांना आधीच कॅनाइन डिस्टेंपर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
एकमेकांच्या संपर्कात आल्याने फैलाव
हा आजार भटक्या श्वानांमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. लाळेतून व वास घेतल्याने आजाराचा फैलाव होतो. अशा अवस्थेत श्वानाला फिट्स येणे, डोक्यात प्रचंड वेदना होणे असे त्रास होतात. त्यामुळे श्वान निपचित पडून शेवटचे श्वास घेत राहतात. प्रतिकारशक्ती कमी असलेले श्वान मृत्युमुखी पडतात.
पाळीव श्वानांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण कमी आहे, कारण ते बाहेरील भटक्या श्वानांच्या संपर्कात येत नाहीत. याशिवाय त्यांचे संपूर्ण लसीकरण केले असल्यामुळे कॅनाइन डिस्टेंपर होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
हे करा
भटक्या श्वानाला कॅनाइन डिस्टेंपर या जीवघेण्या आजारापासून वाचवण्यासाठी तातडीने 'नाईन इन वन किंवा सेव्हन इन वन' ही लस तातडीने द्या, असे आवाहन प्राणिमित्र धनंजय नामजोशी यांनी केले.