इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या शाहू पुरस्काराचे वितरण कोरोनामुळे गेली वर्षभर रखडले आहे. गतवर्षी डॉ. तात्याराव लहाने यांना पुरस्कार जाहीर झाला, शाहू जयंती काही दिवसांवर आली असून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही, या अडचणीच्या पार्श्वभूमीवर आता पुरस्काराचे वितरण कधी, कुठे व कसे करायचे असा पेच तयार झाला आहे.छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जूनला साजरी होत आहे, यानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात आयुष्यभर अतुलनीय कार्य केलेल्या व्यक्तीला शाहू पुरस्काराने सन्मानित केले जाते. जिल्हाधिकारी ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. गेल्यावर्षी डॉ. तात्याराव लहाने यांना हा पुरस्कार जाहीर झाला. मात्र या काळात कोरोनाचा कहर असल्याने पुरस्कार वितरण झाले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर जाहीर कार्यक्रमात किंवा त्यांची भेट घेऊन पुरस्कार दिला जाईल, असे जाहीर केले होते. आता शाहूजयंतीला १५ दिवस राहिले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून रोजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत नाही. कोरोना संसर्गाची स्थिती पाहता यंदाचा पुरस्कार सोहळादेखील होण्याची शक्यता नाही. त्यामुळे गेल्यावर्षी जाहीर केलेल्या पुरस्काराचे कधी, कुठे व कसे वितरण करायचे याचा निर्णय ट्रस्टला घ्यावा लागणार आहे.यंदाच्या पुरस्काराचे काय?शाहू पुरस्कारात आजवर कधी खंड पडलेला नाही, पण यंदा कुणाला पुरस्कार द्यायचा यावर अजून चर्चा झालेली नाही. पुढील काही दिवसांत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
कोरोना कमी झाल्यावर शाहू पुरस्कार देण्याचा निर्णय झाला होता, आता अजून दुसरी लाट सुरू आहे, जिल्ह्यातील परिस्थिती इतकी वाईट आहे, जिल्हा प्रशासनावर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत अगदीच शेवटचा पर्याय म्हणून डॉ. तात्याराव लहाने यांना घरी भेटून पुरस्कार द्यावा लागेल, पण याचा निर्णय ट्रस्टच्या बैठकीत व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर होईल.- प्रा. डॉ. जयसिंगराव पवार,ज्येष्ठ इतिहास संशोधक