कोल्हापूर : कसबा बावडा येथील कोरोनाबाधीत वृध्द महिलेचे विलगीकरणातील १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या घशातील पुन्हा घेतलेल्या पहिल्या स्रावचे चाचणी अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनाने सुस्कारा सोडला. त्यां रुग्णाची प्रकृती सुस्थितीत आहे.शहरालगतच्या कसबा बावडा परिसरातील मराठा कॉलनीतील एका ६३ वर्षीय वृध्द महिलेस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल दि. ६ एप्रिल रोजी सीपीआरमधील आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला. घशाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.
कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठवला होता. तो पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, त्यांच्यावर सीपीआर’च्या विलगीकरण कक्षात उपचार सुरु होते. वृध्द असल्याने त्यांना कोरोनामुक्त करणे हे डॉकटरांसमोर मोठे आव्हान होते.त्यांचे १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण झाल्याने रविवारी त्यांच्या घशातील पहिला स्राव पुन्हा तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठवले होते. तो अहवाल प्रशासनास मंगळवारी निगेटिव्ह प्राप्त झाला. त्यांचा दुसरा स्राव बुधवारी घेण्यात येणार आहे. आतापर्यत मंगळवार पेठेतील भक्तीपुजा नगरातील भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कसबा बावड्यातील त्या वृध्देची प्रकृती कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु आहे.