कोल्हापूर : कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आजच्या घडीला तरी कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग आवाक्यातच असल्याने घाबरण्याचे कारण नाही; पण नागरिकांची बेफिकिरी अशीच राहिली तर मात्र; हा आता दिसणारा १३ रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुख्यमंत्र्यांकडूनच आदेश आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मास्कची कडक अंमलबजावणी व कारवाई सुरू केली असली तरी अजूनही नागरिक बेदरकारपणे विनामास्क फिरताना, गर्दी करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. लग्नसमारंभ धूमधडाक्यात, प्रचंड गर्दीत साजरे होत आहेत.
कोरोना संपला आहे, असे समजूनच भाजीमंडईसह दुकानांमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी होताना दिसत आहे. नो मास्क, नो एन्ट्री हे फलक आता नावालाच उरल्यासारखी परिस्थिती असून, ग्राहक व विक्रेतेही बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर याचा विसर पडल्यासारखी स्थिती आहे.या बेफिकिरीवर प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेकडून नाक्यावर विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची अधिकची कुमक लावली आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही लसीकरणाच्या प्रबोधनासह कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांवर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.