कोल्हापूर : मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दस्त नोंदणीसाठी कोरोना चाचणी, लसीकरणाची अट बंधनकारक केली आहे. ही अट रद्द करून नागरिक, ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी क्रेडाई कोल्हापूर आणि कन्व्हेसिंग प्रॅक्टिशनर, ॲडव्होकेट असोसिएशन कोल्हापूरने शुक्रवारी केली.
दस्त नोंदणी करताना दस्तातील लिहून देणार, लिहून घेणार आणि ओळख देणारे यांचे ४८ तासांतील कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याबाबतचा अधिकृत पुरावा किंवा कोरोनाची लस घेतल्याचे प्रमाणपत्र हे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी बंधनकारक केले आहे. अशा प्रकारची अट राज्यात अन्य कोणत्याही जिल्ह्यात असल्याचे शासन आदेशात नमूद केल्याचे दिसून येत नाही. सर्वसामान्य जनता आधीच कोरोनामुळे अडचणीत आली आहे. अशावेळी त्यांना त्यांच्या स्थावर मिळकतीचे व्यवहार, तसेच बँक गहाणाचे व्यवहार वेळेत करून पैसा उभा करणे आवश्यक आहे. यापूर्वी मुद्रांक शुल्क सवलत योजनेचा घेतलेल्या लाभानुसार दि. ३० एप्रिलपूर्वी दस्त नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचा विचार करून मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अट रद्द करावी. राज्य शासनाने लागू केलेल्या अटी, शर्तीनुसार दस्त नोंदणीची प्रक्रिया लागू करावी. सर्वसामान्य जनतेस दिलासा द्यावा, अशी मागणी कन्व्हेसिंग प्रॅक्टिशनर, ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र किंकर, उपाध्यक्ष ॲड. नामदेव साळोखे आणि ‘क्रेडाई कोल्हापूर’च्या वतीने अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी केली आहे.
चौकट
बांधकाम व्यावसायिक, नागरिकांवर अन्याय
राज्य शासन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी केलेल्या सूचनांमध्ये दस्त नोंदणीसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा पुरावा अथवा कोरोनाची लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याची नोंद नाही. त्यामुळे कोल्हापुरातील सहजिल्हा निबंधक वर्ग एक यांनी घातलेली अट ही बांधकाम व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्यायकारक आहे. ही अट रद्द करावी, अशी मागणी विद्यानंद बेडेकर यांनी केली आहे.
चौकट
दक्षतेसाठी अट लागू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता आणि सुरक्षिततेसाठी कोरोना चाचणी, लसीकरणाची अट लागू केली आहे. कोल्हापूर शेजारील सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये ही कोरोना चाचणी, लसीकरणाची अटीचे पालन करून दस्त नोंदणी सुरू असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी डी. आर. पाटील यांनी सांगितले.