CoronaVirus Lockdown : लाकडात साकारली अंबाबाईची अप्रतिम मूर्ती..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 01:38 PM2020-06-10T13:38:10+5:302020-06-10T14:19:48+5:30
शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरूण कारागीर कपिल सुतार याने लाकडावरील कलाकुसरीतून अनेक शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्यातील करवीर निवासीनी अंबाबाईची मूर्ती तर अप्रतिम आहे. लॉकडाऊनच्या काळातील त्याच्या कलाकुसरीचे विशेष कौतुक होत आहे.
राम मगदूम
गडहिंग्लज (कोल्हापूर) : शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरूण कारागीर कपिल सुतार याने लाकडावरील कलाकुसरीतून अनेक शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्यातील करवीर निवासीनी अंबाबाईची मूर्ती तर अप्रतिम आहे. लॉकडाऊनच्या काळातील त्याच्या कलाकुसरीचे विशेष कौतुक होत आहे.
वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील सर्व सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याचे कुटूंब आजोळी शेंद्रीत वास्तव्याला आले. त्याचे मामा पांडूरंग विष्णू लोहार यांचा पारंपरिक व्यवसाय लोहारकीचा. परंतु, काही तरी वेगळे करायचे म्हणूनच तो बारावीनंतर सुतार कामाकडे वळला.
गडहिंग्लज परिसरात लाकडी फर्निचर बनविण्याची लहान-सहान कामे करुन तो कुटूंबाला हातभार लावतो. झाडांच्या मुळापासूनही तो अनेक वस्तू बनवितो. त्याला चित्रे काढण्याचाही छंद आहे.
७/८ वर्षापूर्वी त्याने पहिल्यांदा गणेशाची लाकडी मूर्ती बनवली. तेंव्हापासूनच त्याला हा छंद जडला. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात बाहेरची कामे बंद झाली. त्यामुळे रडत न बसता त्याने वेळेचा सदुपयोग केला. त्यातून त्याच्यात दडलेला हरहुन्नरी कलाकार उजेडात आला.
कोरोनाने दिला आत्मविश्र्वास..!
मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. आपल्या लग्नापूर्वी स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी हा छंद उपयोगी पडेल, असा आत्मविश्वास ‘कोरोना’च्या संकटातून मिळाला, असे कपिलने आवर्जून सांगितले.
‘कपिल’चा कलाविष्कार...!
छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, बाळूमामा, अंबाबाई आदी देवदेवतांच्या मूर्तीसह विविध प्रकारची लाकडी हत्यारे, पाळणा, बैलगाडी, होडी, किचन टूल्स यासह अनेक खेळणीदेखील त्याने बनविल्या आहेत.