CoronaVirus Lockdown : कम्युनिटी किचन; दोनवेळ घरच्यासारखे जेवण, नाष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:09 PM2020-04-20T12:09:48+5:302020-04-20T12:13:00+5:30
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री सरस्वती मंगल कार्यालयामधील निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण आणि नाष्टा करण्यात येतो. दोनवेळा अगदी घरच्या सारखे जेवण, नाष्टा मिळतो. आमचं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीने जीव व्याकुळ होत आहे. आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी जाण्याची सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी या निवारागृहातील व्यक्तींकडून करण्यात आली.
कोल्हापूर : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील श्री सरस्वती मंगल कार्यालयामधील निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये रोज ३६ जणांचे जेवण आणि नाष्टा करण्यात येतो. दोनवेळा अगदी घरच्या सारखे जेवण, नाष्टा मिळतो. आमचं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीने जीव व्याकुळ होत आहे. आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी जाण्याची सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी या निवारागृहातील व्यक्तींकडून करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून या निवारागृहामध्ये दि. ३१ मार्चपासून महाराष्ट्रातील दोन आणि तमिळनाडू, केरळ, बिहार, उत्तरप्रदेशमधील ३४ जण आहेत. कुल्फी विक्रेते, सेल्समन, मजूर म्हणून काम करणाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना सकाळी, सायंकाळी नाष्टामध्ये पोहे, उप्पीट, बिस्कीट, चहा दिला जातो.
जेवणामध्ये चपाती, भात, आमटी, भाजी देण्यात येते. कणेरी येथील श्री सिद्धगिरी मठाकडून भात, कढी दिली जाते. निवारागृहातील कम्युनिटी किचनमध्ये सकाळी चपाती, भाजी, तर रात्री पूर्ण जेवण केले जाते. रॉबीनहूड आर्मी, अमर गांधी ग्रुप, संजय घोडावत ग्रुप, उजळाईवाडीतील विविध कॉलनींमधील नागरिकांकडून नाष्टा, जेवणासाठी मदत केली जात आहे.
स्वयंस्फूर्तीने कामात मदत
दिवसभर बसून वेळ जात नाही म्हणून या निवारागृहातील व्यक्ती स्वयंस्फूर्तीने त्याठिकाणी काम करतात. फरशी पुसणे, झाडून काढणे, जेवण करण्यासाठी मदत करणे, चहा-नाष्टा आणि जेवणाचे वाटप करणे, आदी स्वरूपातील कामे ते करीत आहेत.
‘इतनी शक्ति हमे दे ना दाता’
निवारागृहातील व्यक्तींच्या मनोरंजनासाठी प्रशासनाने गाणी ऐकण्याची सुविधा पुरविली आहे. त्यामुळे येथे सकाळी आणि सायंकाळी ‘इतनी शक्ति हमे दे ना दाता...’ या गीताचे सूर ऐकायला मिळतात.
याठिकाणी आम्हाला दोनवेळा घरच्यासारखे जेवण, नाष्टा मिळत आहे. कोणतीही अडचण नाही. माझं पोट भरतंय, पण कुटुंबाच्या काळजीमुळे जीव टांगणीला लागला आहे.
-ब्रीजभूषण, कानपूर, उत्तरप्रदेश
कृषी उत्पादनांचा सेल्समन म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून मिरज येथे काम करीत आहे. या निवारागृहात चांगली सुविधा आहेत. आम्हा सर्वांना लवकर घरी जाण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी.
-रणजित, तमिळनाडू
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या सोयी-सुविधा या निवारागृहातील व्यक्तींना पुरविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकरिता जेवण करण्यासाठी महिला आचारी नेमण्यात आली आहे. जेवणासाठी स्वयंसेवी संस्थांची देखील काही प्रमाणात मदत होत आहे.
-बाळासाहेब सरगर, समन्वयक, निवारागृह