CoronaVirus Lockdown : भाजीपाला खरेदी परवान्यासाठी बाजार समिती रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:47 AM2020-04-22T10:47:43+5:302020-04-22T10:49:27+5:30
कोल्हापूर बाजार समिती समितीतून भाजीपाला खरेदीसाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी गेली आठवडाभर समितीच्या मुख्य कार्यालय आवारात विक्रेत्यांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात.
कोल्हापूर : गेली महिनाभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावरील पोट असणारे व्यावसायिक व एमआयडीसीमधील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्वजण भाजीपाला विक्रीकडे वळले असून कोल्हापूर बाजार समिती समितीतून भाजीपाला खरेदीसाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी गेली आठवडाभर समितीच्या मुख्य कार्यालय आवारात विक्रेत्यांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात.
‘कोराना’मुळे सगळी यंत्रणा कोलमडून पडली आहे. खरे हाल ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचे होत आहे. गेली महिनाभर हाताला काम नसल्याने सगळे सैरभैर झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात किराणा, भाजीपाला व फळांची विक्री एवढेच व्यवसाय सुरू आहेत.
त्यामध्ये सगळ्यास स्वस्त व चार पैसे मिळवून देणारा म्हणजे भाजीपाला विक्री आहे. त्यामुळे एमआयडीसीतील कामगार, रिक्षाचालकांसह इतर छोटे-छोटे व्यवसाय करणारे सर्वजण भाजीपाला विक्रीकडे वळले आहेत.
बाजार समितीची परवानगी असल्याशिवाय तेथून भाजीपाल्याची खरेदी-विक्री करता येत नाही. यासाठी बाजार समितीकडे परवानगी मागणीसाठी सध्या रांगा लागलेल्या दिसतात. मंगळवारी समितीच्या मुख्य कार्यालय आवारात किमान अर्धा किलोमीटरची रांग लागली होती. कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने समितीच्यावतीने त्यांना परवानगी दिली जात आहे.