CoronaVirus Lockdown : शाळा आता जूनमध्येच भरणार, वर्गांचे निर्जंतुकीकरण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:58 AM2020-04-22T10:58:55+5:302020-04-22T11:07:29+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने शाळांना सुटी दिली आहे. त्यासह इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाबाबतची एकूणच स्थिती पाहता आता जूनमध्ये शाळा सुरू होतील, असे चित्र दिसत आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे राज्य शासनाने शाळांना सुटी दिली आहे. त्यासह इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाबाबतची एकूणच स्थिती पाहता आता जूनमध्ये शाळा सुरू होतील, असे चित्र दिसत आहे.
परीक्षा रद्द झाली, तरी निकाल हा जाहीर करावाच लागणार आहे. निकाल कोणत्याही पद्धतीने तयार करावयाचा याबाबत स्पष्ट माहिती शासनाकडून लवकर मिळावी, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने लॉकडाऊनमुळे दि. १५ मार्चपासून शासनाने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होतील, असे शक्यता होती. मात्र, कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने पहिली ते नववीपर्यंतची परीक्षा रद्द करून शाळांना सुटी देण्यात आली.
दरवर्षी निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमिक शाळांना दि. १ मे, तर प्राथमिक शाळांना दि. ८ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होते. ही सुटी दि. १४ जूनपर्यंत असते. त्यानंतर दि.१५ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होतात. मात्र, यावर्षीच्या कोरोना संकटामुळे शाळांचा प्रारंभ जूनमध्ये होईल. पण, त्याबाबतची तारीख बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्यांची सुरक्षितता आणि कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत शासनपातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या विविध शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील स्थलांतरीत झालेल्या नागरिकांसाठी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या शाळांसह सर्वच शाळांचा परिसर आणि वर्गांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरणार आहे.
शिक्षण विभागाने नियोजनाची माहिती द्यावी
निकाल तयार करणे. तो जाहीर करण्याची तारीख, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुटीचा कालावधी आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याची तारीख याच्या नियोजनाची माहिती राज्याच्या शिक्षण विभागाकडून मिळावी. या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याचे राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची साखळी तुटणे आवश्यक आहे. प्रादुर्भाव कमी अथवा थांबल्यानंतरच शाळा सुरू करणे योग्य ठरणार आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचा निकाल लावण्याच्या पद्धतीची माहिती शासनाने लवकरात लवकर द्यावी.
- संतोष आयरे,
उपाध्यक्ष, राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ
विद्यार्थ्यांची सुरक्षिततेसाठी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे संकट दूर झाल्यानंतरच शाळा सुरू करण्यात याव्यात. शाळा सुरू करण्यापूर्वी औषध फवारणी करून त्यांच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
-राजेश वरक,
अध्यक्ष, कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ
इयत्ता पहिली ते नववीपर्यंतची परीक्षा होणार नाही. या इयत्तांचा निकाल लावण्याबाबतच्या शासनाच्या २० मार्चच्या परिपत्रकानुसार कार्यवाही करावयाची आहे. त्याबाबतच्या सूचना शाळांना केल्या आहेत.
- सत्यवान सोनवणे,
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग