कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेले लॉकडाऊन अघोषितपणे शिथील झाल्याने मंगळवारी शहरात सर्वत्र नागरिकांची रेलचेल सुरु होती.
बाजारपेठांमध्ये अन्य साहित्यांची दुकाने बंद असली तरी किराणा माल, मिरची, भाज्या, आंबे या साहित्यांच्या खरेदीसाठी ठिकठिकाणी ग्राहकांची गर्दी होती. गेले महिनाभर घरी थांबलेले नागरिक मंगळवारी मात्र दैनंदिन व्यवहारांसाठी व अ़न्य कामांसाठी ये जा करत होते, त्यामुळे इतके दिवस शांत असलेल्या रस्त्यांवर वाहनांचे आवाज आणि वर्दळ जाणवत होती.लक्ष्मीपुरीत ट्रॅफिक जॅमकोल्हापुरची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लक्ष्मापुरीत मंगळवारी दुपारी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. येथेच मालाची आवकही झाल्याने ट्रक, टेंम्पो सारखी अवजड वाहने होती. त्यातच नागरिकांनी आणलेल्या दुचाकीमुळे बाजारातील सर्वच गल्ल्यांमध्ये ट्रॅफिक जॅम होत होते. शिवाय मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भाजी, फळ विक्रेते बसल्याने येथेही खरेदीदारांची रेलचेल होती.