Coronavirus Unlock : चायनीज पदार्थांकडेही खवय्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:34 AM2020-06-25T11:34:07+5:302020-06-25T11:38:26+5:30

कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे चायनीज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झाला होता, त्यात आता सीमेवर चीननेही भारताबरोबर पंगा घेतल्यावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आल्याने चायनीज पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या दीड हजार जणांचा रोजगार बुडाला आहे. या व्यवसायातील गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाच कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.

Coronavirus Unlock: Eaters turn their backs on Chinese food | Coronavirus Unlock : चायनीज पदार्थांकडेही खवय्यांनी फिरवली पाठ

Coronavirus Unlock : चायनीज पदार्थांकडेही खवय्यांनी फिरवली पाठ

Next
ठळक मुद्देपाच कोटींची उलाढाल ठप्प दीड हजार जणांचा रोजगार बुडाला

सचिन भोसले

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे चायनीज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झाला होता, त्यात आता सीमेवर चीननेही भारताबरोबर पंगा घेतल्यावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आल्याने चायनीज पदार्थ बनवून विक्री करणाऱ्या दीड हजार जणांचा रोजगार बुडाला आहे. या व्यवसायातील गेल्या तीन महिन्यांत सुमारे पाच कोटींपेक्षा अधिकची उलाढाल ठप्प झाली आहे.

अलीकडील काही वर्षांत चायनीज पदार्थांना मोठी मागणी आहे. कोंबड्यांपासून कोरोना होतो अशी अफवा पसरल्यानंतर चायनीज पदार्थांकडे खवय्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर लॉकडाऊन आणि चीनने सीमेवर भारताबरोबर पुकारलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यात भर पडली. त्याचा फटका कोल्हापुरातील चायनीज सेंटर चालविणाऱ्यांना बसला.

अनेकांनी व्यवसाय अक्षरश: गुंडाळले आहेत. काही मोजक्याच सेंटरमधून गोबी मंच्युरियन, सिक्स्टी फाईव्ह, शेजवान राईस, अख्खा नूडल्स, विविध सुप, फ्राईड राईस अशा पदार्थांची मागणी अल्प प्रमाणात आहे. त्यातून हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच लोकांची कुटुंबे या सेंटरवर चालत आहेत. या व्यवसायाला लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसायही ठप्प झाला आहे.

या पदार्थांना सर्वाधिक मागणी होती

शेजवान राईस, नूडल्स वुईथ राईस, सिंगापुरी राईस, जिंजर राईस, हॉगकाँग राईस, यंग चाऊ राईस, मलेशियन राईस, ट्रिपल शेजवान राईस, मांसाहारी फ्राईड राईस, हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, चाऊ मेन, चायनीज भेळ, व्हेज सुप, नूडल्स सुप, स्वीटकार्न सुप, हॉट अ‍ॅन्ड सोर सुप, व्हेज मंच्युरी, व्हेज चिली, स्विट गार्लिक सुप, फ्राईड क्रीस्पी अशा पदार्थांना मागणी अधिक होती. मात्र, आता केवळ मंच्युरियन , सिक्स्टी फाईव्हलाच तेही अत्यल्प मागणी आहे.

सेला राईसची मागणी घटली

चायनीज पदार्थांमध्ये विविध प्रकारचे शेजवान राईस, फ्राईड राईस बनविण्याकरीता सेला या जातीचा तांदूळ लागतो. तो दिल्ली येथून देशभरात जातो. कोल्हापुरातही या तांदळाला महिन्याकाठी ६० टनांची मागणी होती. लॉकडाऊननंतर ती अत्यल्प झाली आहे.

शहरात ३५० हून अधिक चायनीज सेंटर

शहरात ३५० हून अधिक चायनीज खाद्यपदार्थ सेंटर आहेत. त्यांपैकी केवळ ५० जणांची महापालिका इस्टेट विभागात नोंदणी आहे. चालकांसह १५०० हून अधिक जणांची कुटुंबे या व्यवसायावर निर्भर आहेत.

चिली बेन पेस्ट

चीनमधून काही मसाल्याच्या पदार्थांबरोबर चिली बेन पेस्ट येतात. या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळण्यासाठी लागणारे मोनोसोडियम ग्लुटामेंट (अ‍ॅजिनोमोटो), शेजवान राईस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न, सोया, चिली, मंच्युरियन, ड्रॅगन फ्रुट‌्स असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सॉस महत्त्वाचा घटक आहे. हे स्थानिक पातळीवर तयार होतात आणि मिळतातही. मात्र, या पदार्थांकडेही संशयाने पाहिले जात आहे


भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊननंतर चायनीज पदार्थांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
- अरविंद काळुगडे,
चायनीज सेंटर चालक

Web Title: Coronavirus Unlock: Eaters turn their backs on Chinese food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.