कोल्हापूर : इतर जिल्ह्यांतून शहरात आलेले काही नागरिक परस्पर घरी गेले असतील तर त्यांचा शोध घ्यावा, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्ही.सी. प्रणालीद्वारे वैद्यकीय अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांना दिली.इतर जिल्ह्यांतून काही नागरिक तपासणी नाके पार करून शहरात येत असून थेट घरी जात असल्याची माहिती प्रशासनाकडे आल्यानंतर आयुक्तांनी बैठक घेऊन संबंधितांना सूचना केली. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी व शहरासाठी क्वारंटाईनचे नियम पाळावेत, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
वैद्यकीय अधिकारी यांनी सर्वेक्षणावर अधिक भर द्यावा. छत्रपती शाहू मार्केट यार्ड येथे २४ तास स्क्रीनिंगची व्यवस्था सुरू ठेवावी; रेड झोनमधून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक आहे. कोणीही होम क्वारंटाईनसाठी आग्रह धरू नये. रेड झोनमधून येणाऱ्यां नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी सुरक्षित अंतर ठेवावे. त्यांच्या वापरात येणारे अंथरूण, भांडी, स्वतंत्र ठेवावीत. यासाठी संपर्कात येणाऱ्या केअरटेकरांनी हँडग्लोव्हज वापरावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.विनामास्क व सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी सर्व सचिवांना पावती पुस्तक देण्याच्या सूचना उपायुक्त निखिल मोरे यांना दिल्या. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, प्रशासनाधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या काळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडील सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व समन्वय अधिकारी व्ही.सी.द्वारे उपस्थित होते.