कोल्हापूर : कोरोगेटेड बाॅक्सच्या उत्पादन खर्चात सत्तर टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यात केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वेस्टर्न इंडिया बाॅक्स उत्पादकांच्या सह्याद्री डिव्हिजनच्या सोमवारी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत करण्यात आली.
विविध उत्पादने व वस्तूंच्या पॅकिंगसाठी कागदापासून बाॅक्स तयार केले जातात. काही दिवसांपासून कोरोगेटेड बाॅक्ससाठी लागणाऱ्या क्राफ्ट पेपरमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल ७० ते १०० टक्के इतकी आहे. देशात तयार होणारा क्राफ्ट पेपर चीनला निर्यात होत असल्याने पेपरची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे देशातील कच्च्या मालाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. परदेशातून येणाऱ्या पेपर उत्पादक कंपन्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धताही अनेक महिन्यांपासून ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे क्राफ्ट पेपरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कोरोगेटेड बाॅक्स हा पॅकेजिंगमधील महत्त्वाचा घटक असून, त्याचा वापर दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तू, उद्योगातील उत्पादने, औषध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या पॅकिंगसाठी केला जातो. बाॅक्सच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे या सर्व उद्योगांवर त्याचा परिणाम होणार आहे. या व्यवसायावर उदरनिर्वाह असलेल्यांवर हे मोठे संकट आहे. त्यामुळे हा उद्योग वेळीच सावरण्याची गरज आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी प्रताप पुराणिक, शशिकांत सावंत, अशोक पाटील, सोमनाथ पेपर मिलचे अशोकराव चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. विनोद पाटील यांनी आभार मानले.