कोल्हापूर : कोल्हापूरचे खऱ्या अर्थाने पालकत्व निभावणारे जबाबदार पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर कोल्हापूरच्या शिवसेना शहरप्रमुखांनी बिनबुडाचे आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशी टीका करणे त्यांनी थांबवावे अन्यथा कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा
माजी नगरसेवक, कोल्हापूर शहर काँग्रेसचे समन्वयक सचिन चव्हाण व
संजय पोवार-वाईकर यांनी शनिवारी प्रसिद्धी पत्रकात दिला.
पत्रकात म्हटले आहे की, २०१९ च्या महापुराच्या संकटात जेव्हा संपूर्ण जिल्ह्याचा जगाशी संपर्क तुटला होता; तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यातून एकटे सतेज पाटील कुटुंबासाहित पूरबाधित नागरिकांच्या सेवेसाठी पाण्यात उतरले होते. हे तेव्हा संपूर्ण राज्याने पाहिले होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी स्वत: पालकमंत्री पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री १२-१२ वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते.
महापुराच्या काळात किंवा कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील नागरिकांना जेवणाची पाकीटं असो, औषधी असो किंवा इतर काही लागेल ते सर्व पालकमंत्र्यांनी पदरमोड करून उपलब्ध करून दिले होते. राज्यात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना काँग्रेसच्या राज्यमंत्र्यांवर शहरप्रमुख आरोप करतो याचा नक्की काय अर्थ घ्यावा..? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली कोरोनाविरोधात लढाई करत असताना त्यांचेच पदाधिकारी भाजपला मदत करत आहेत हे महाविकास आघाडीच्या विरोधात आहे. हे का केलं जातंय याचा विचार शिवसेनेने नक्की करावा. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वांनी भाजपला छुपी मदत करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच आवर घालावा व योग्य ती कारवाई करावी. बिनबुडाचे आरोप करणाऱ्या शहर प्रमुखांना आवरा.