इचलकरंजी : शहरात जुलै महिन्यात येऊन गेलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले. काहींची घरे पडली, तर काहींच्या शेतातील उभी पिके वाहून गेली. अनेकांची जनावरेही दगावली. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना महापुराच्या संकटातून बाहेर येणे, जिकरीचे झाले. याची दखल घेत, गावभाग परिसरातील युवा ग्रुप या गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करत, महापुरात दुभती म्हैस मरण पावलेल्या शेतकरी महिलेस उत्सवाच्या इतर खर्चाला फाटा देत, गाय भेट स्वरूपात दिली.
पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, महापूर ओसरून दोन महिने लोटले, तरी अद्याप काही जणांना दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे दुभती जनावरे ही उपजीविकेचे साधन असणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. महापुरात मंगल पांडुरंग तोडकर या महिलेची दुभती म्हैस मरण पावली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. मदत मिळावी, यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासनाच्या जाचक अटीमुळे नुकसान भरपाई मिळाली नाही. याची माहिती युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे यांना मिळाली. मंडळातील सदस्यांनी अडचणीत असलेल्या मंगल तोडकर या शेतकरी महिलेला गणेशोत्सवाच्या इतर खर्चाला फाटा देऊन, दुभती गाय त्या महिलेला देण्याचा एकमताने निर्णय घेत गाय भेट दिली. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुनील महाजन, नगरसेवक सागर चाळके, राजेंद्र बचाटे, विजय जाधव, दादासाहेब मगदूम, डॉ.विजय माळी, डॉ.संदीप बरगे, यांच्यासह भागातील महिला, मंडळाचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
फोटो ओळी
इचलकरंजी : येथील युवा ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त महिलेस गाय भेट देताना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बचाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.