(पीएन यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दुधाच्या वाढीव संकलनासह बाजारपेठेच्या गोकुळ दूध संघाच्या विस्ताराची ब्लू प्रिंट आमच्याकडे तयार असल्याचे संघाच्या निवडणुकीतील सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार पी.एन. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, आजवर ‘गोकुळ’ने जी प्रगती केली आहे, त्यामध्ये नेतेमंडळींचे योग्य मार्गदर्शन आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा मोठा हात आहे. कानाने ऐकणे आणि डोळ्याने पाहणे यात फरक आहे. त्याचप्रमाणे केवळ हवेत विकासाच्या गप्पा मारणे आणि प्रत्यक्षात स्वत:ला सिद्ध करून दाखवणे, यामध्ये फरक असतो. सत्ताधारी पॅनलमधील ज्येष्ठ संचालक हे या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. शिवाय नवे उच्चशिक्षित आणि अनुभवी लोकही आमच्या पॅनलमध्ये आहेत. त्याच्या जोरावर येणाऱ्या काही वर्षांत गोकुळसाठी नवे मापदंड निर्माण करण्याचा आमचा विचार आहे. त्याची ब्लू प्रिंट तयार आहे.
‘गोकुळ’ने रोजचे तीन लाख लिटर दूध संकलन होत असताना, ५ लाख क्षमतेचे विस्तारीकरण केले होते. नंतर ७ लाख संकलन होत असताना, १० लाख विस्तारीकरण केले. पुढे १० लाख संकलन असताना १५ लाख क्षमतेचे विस्तारीकरण केले. सध्या रोजचे १३ ते १५ लाख लिटर दुधाचे संकलन असल्यामुळे, दैनंदिन २० लाख लिटर क्षमतेचे विस्तारीकरण केले आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून, गोकुळने वेळोवेळी आधुनिक पद्धतीने विस्तारीकरण केले. त्यामुळेच संघाची आणि पर्यायाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती होत गेली; पण विरोधी आघाडीकडून या विस्तारीकरणातही आक्षेप घेतले गेले, हे त्यांच्या संकुचित आणि राजकीय द्वेषबुद्धीचे दर्शन घडवत आहे. रोज २० लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. तो पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लागणारी सर्व साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामुळे येणाऱ्या काळात दूध संकलनात मोठी वाढ होईल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळ हाच ब्रँड
पुणे- मुंबई शहरांतील दूधविक्रीत गोकुळचा वाटा मोठा आहे. दूध संकलन, प्रक्रिया करणे सोपे आहे; पण त्याचे ब्रॅँडिंग करणे सोपे नाही. मुंबईसारख्या महानगरामध्ये गोकुळसारखे २०० ब्रॅँड दूध विक्रीसाठी आणतात. प्रचंड मोठी स्पर्धा असतानाही लोक पहिली पसंती गोकुळला देतात, हे मोठेच यश म्हणावे लागेल.
आशियाई मार्केटमध्ये जाणार
महाराष्ट्रासोबत आता गोवा आणि कर्नाटकातील प्रमुख शहरांतही गोकुळच्या नव्या शॉपी निर्माण करण्याचा मानस आहे. शिवाय पूर्व आशियाई देश आणि आखाती देशांत अनेक कंपन्यांशी बोलणे सुरू आहे. लवकरच या देशांतील प्रमुख मॉलमध्ये, गोकुळची उत्पादने मिळू लागतील. दुग्धजन्य पदार्थांतून मिळणारा नफा हा पिशवीतील दुधातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा अधिक आहे. आपण सध्या तयार करत असलेल्या उपपदर्थांत वाढ करून, येणाऱ्या काळात जागतिक मार्केटमध्ये उतरू शकतो.