कोल्हापूर : बीपीएल-एसबीआय क्रेडिट कार्डचा स्वत:साठी एकदाही वापर केला नसताना त्यावरील ५५ हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. दयानंद आण्णाप्पा कुरले (रा. फुलेवाडी) यांची ही फसवणूक झाली असून, त्यांनी बँकेकडे त्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. क्रेडिट कार्ड देणारी कंपनी, त्यासाठी घेतलेल्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करणारी यंत्रणा व फ्रॉड करणारी यंत्रणा यांच्यात साखळी असल्याचा संशय या प्रकरणात व्यक्त होत आहे.कुरले यांचा सोन्याच्या मण्यामध्ये लाख भरण्याचा व्यवसाय आहे. घरातच ते हा व्यवसाय करतात. रंकाळ्याजवळील मॉलमध्ये खरेदीसाठी गेल्यावर तिथे त्यांना एसबीआयचे क्रेडिट कार्ड घ्या म्हणून आग्रह झाला. त्यांनी त्यानुसार स्वत:ची कागदपत्रे व माहिती भरून दिली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी त्यांना ०११ कोड असलेल्या क्रमांकावर वीसहून अधिक वेळा फोन आले. त्यानंतर त्यांना १५ दिवसांत म्हणजे २ जुलैला हे क्रेडिट कार्ड आले.
हे कार्ड ‘बीपीसीएल-एसबीआय’ कंपनीचे होते. हे कार्ड देताना त्यांच्याकडून कार्ड प्रोटेक्शन प्लॅन म्हणून विम्याचे १६९९ रुपये कार्डमधूनच जमा करून घेण्यात आले. त्यांच्या कार्डची उलाढाल मर्यादा ५८ हजार होती. त्यानंतर ७ जुलैला दुपारी दीड वाजता त्यांच्या कार्डवरून ५५१२५ रुपये एकाचवेळी काढून घेण्यात आले. त्याचा मेसेज कुरले यांना आल्यावर त्यांनी तातडीने चौकशी केली असता ही रक्कम जीसीआय नेटवर्क, मुंबई या कंपनीच्या खात्यावर गेल्याचे स्पष्ट झाले.लगेच हे कार्ड ब्लॉक झाले व तसा मेसेज त्यांना बँकेकडून आला. त्यांनी कार्ड प्रोटेक्शन प्लॅनचे पैसे भरले असल्याने एक लाख रुपयांच्या रकमेचा फसवणुकीचा विमा आहे. त्यामुळे कार्डवरून काढून घेतलेली रक्कम कुरले यांना द्यावी लागणार नाही. ही रक्कम विम्यापोटी भरली जाणार आहे. त्यासाठी ते गेले पंधरा दिवस स्टेट बँकेच्या कोषागार कार्यालयात पाठपुरावा करीत आहेत.को-ब्रॅण्डमधून फसवणूक जास्तमॉलमध्ये खरेदीस गेल्यावर क्रेडिट कार्ड घेण्याबद्दल जो आग्रह केला जातो, ते कार्ड शंभर टक्के संबंधित बँकेचे नसते. को-ब्रॅण्ड म्हणून विविध कंपन्यांकडून अशा कार्डचे वाटप केले जाते व यामध्ये फसवणुकीचा धोका अधिक असल्याचे वित्तीय क्षेत्रातील जाणकारांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याऐवजी कोणत्याही बँकेच्या अधिकृत शाखेतून घेतलेले कार्ड अधिक सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.विश्वास का ठेवला?कुरले यांनी एसबीआय कार्ड लिमिटेड या नंबरवर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आलेल्या फोनवर घरचा पत्ता दिला होता. त्यांचे घर व दुकान एकत्रच असल्याने ते बँकेने मान्य केले नाही. त्यामुळे ज्यांनी फोन केला त्यांनीच तुमच्या दुकानाचा पत्ता तळमजल्यावर व निवासी पत्ता पहिल्या मजल्यावर असा लिहितो असे सांगितले.
हीच माहिती त्यांना पुन्हा विचारून त्यावेळी कार्डचा पिन नंबर विचारण्यात आला व लगेच पैसे काढून घेण्यात आले. कुरले यांच्या पत्त्याबद्दलची माहिती फक्त कार्ड कंपनीलाच दिली असताना ती फसवणूक करणाऱ्या लोकांपर्यंत कशी गेली? हेच खरे गौडबंगाल आहे.विम्यासाठी आग्रह...कुरले यांची कार्डसाठी विमा घेण्याची तयारी नव्हती; परंतु तरीही त्यांना आग्रह करून तो घ्यायला लावला. त्याची रक्कम जमा होताच लगेच दोन दिवसांत फसवणूक झाली. म्हणजे कार्ड घेण्यासाठी आग्रह करणारे लोक, कागदपत्रांची छाननी करणारे व फसवणूक करणाऱ्यांची साखळी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.