दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे : अभिनव देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 04:14 PM2019-10-17T16:14:37+5:302019-10-17T16:15:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात दंगाधोपा करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्यात ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावे आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर पाच हजार पोलीस नजर ठेवून आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २१) मतदान होत आहे. चारच दिवस राहिल्याने प्रचाराला गती आली आहे. मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात अनेक छुप्या घडामोडी घडू शकतात. अशावेळी दंगाधोपा केल्यास उमेदवारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिले आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल, शाहूवाडी-पन्हाळा, करवीर, इचलकरंजी मतदारसंघांतील ७५ अतिसंवेदनशील व १५८ उपद्रवी गावांचा समावेश आहे. त्या ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू असून ते कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला पाच हजार सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाईल. दंगल काबू, राज्य राखीव, केंद्रीय दल, रेल्वे पोलीस यांच्यासह ओडिसा, कर्नाटक, गोव्यातील १० विशेष पथके दोन दिवसांत बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत. कोल्हापूर दक्षिण, कागल परिसरात पोलिसांचे विशेष लक्ष असून दिवसरात्र गस्त सुरू आहे. एखादा अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यात येत्या चार दिवसांत कडक नाकाबंदीसह ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करण्याचे आदेश दिले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
मोबाईल बंदी
जिल्ह्यात तीन हजार ३२१ मदान केंद्रांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतर्फे मतदान केंद्राच्या परिसराची पाहणी केली जाणार आहे. मतदान केंद्रासह परिसरात मोबाईलचा वापर केल्यास तो जप्त करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.
हालचालींवर लक्ष
मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात फोडाफोडीचे राजकारण होत असते. अशावेळी पैशांची देवाणघेवाणही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुतांश उमेदवार गुंडांचा वापर करत असतात. त्यामुळे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह शहरासह, उपनगर, गावागावांतील राजकीय पुढाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
------------------------
-एकनाथ पाटील