सांगलीच्या जिम्नॅस्टिक खेळाडूसह, दोघां पदाधिकाऱ्यांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 01:55 PM2020-06-09T13:55:29+5:302020-06-09T14:15:40+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मुलाखतीवेळी राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सांगलीचा जिम्नॅस्टीक खेळाडू विजय सदाशिव बोरकर (रा. ५ महादेव स्मृती, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी १०० फुटी रोड, चिन्म आश्रमनजीक, सांगली) याच्यासह जिम्नॅस्टिक असोएशनच्या दोघा पदाधिकाऱ्यांवर कोल्हापूरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मुलाखतीवेळी राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सांगलीचा जिम्नॅस्टीक खेळाडू विजय सदाशिव बोरकर (रा. ५ महादेव स्मृती, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी १०० फुटी रोड, चिन्म आश्रमनजीक, सांगली) याच्यासह जिम्नॅस्टिक असोएशनच्या दोघा पदाधिकाऱ्यांवर कोल्हापूरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचीव दीपक सावंत (रा. मिरज, जि. सांगली) व राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचीव महेंद्र आनंद चेंबुरकर (रा. ३४, डी, चेंचूर गावठाण, मुंबई) अशी सहाय्य करणाऱ्या गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
शासकिय नोकरीमध्ये राष्ट्रीय खेळाडूंना ५ टक्के आरक्षण आहे. या आरक्षणाचा लाभ उठविण्यासाठी सांगलीतील जिम्नॅस्टीक खेळाडू विजय बोरकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१६ च्या परिक्षेत मुलाखतीवेळी मिरज येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतील सहभागचे प्रमाणपत्र सादर केले. हे प्रमाणपत्र बोगस नसल्याचा दोघा पदाधिकाऱ्यांनी अहवालातून निर्वाळा दिला.
पुणे क्रीडा विभागाने गंभीरपणे दखल घेत हे प्रकरण फेरपडताळणीसाठी कोल्हापूर विभागीय उपसंचालक कायार्लयाकडे दिले. त्याची फेरपडताळणी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी शंकर गंगाराम भास्कर यांनी केली, त्यांना हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल पुणे आयुक्त कार्यालयास सादर केला.
शिफारशीनुसार क्रिडाधिकारी भास्करे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय बोरकर, महेंद्र चेंबुरकर व दीपक सावंत या तिघांवर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करत आहेत.