कोल्हापूर : गॅस सिलिंडरची जिल्ह्यात अजिबात टंचाई नाही. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्व गॅस वितरकांनी ग्राहकांना विनाविलंब सिलिंडर द्यावे, त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अन्यथा जीवनावश्यक कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी बुधवारी दिला. साठेबाजी व अन्य कोणत्याही स्वरूपाची तक्रार आल्यास संबंधित वितरकावर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील शाहू स्मारक भवनात आयोजित जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांच्या बैठकीत ते बोलत होते. आगवणे म्हणाले, ग्राहकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन गॅस वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी करणे बंधनकारक आहे. सिलिंडरची साठेबाजी करू नये. विनाविलंब ग्राहकांना गॅस पुरवठा करावा, या सूचनांचे पालन न करणाऱ्या वितरकांवर कारवाई करण्यात येईल. वितरकांच्या साठ्याची सातत्याने तपासणी केली जाणार आहे. दोषी आणि ग्राहकांना दर्जेदार, तत्पर सेवा न देणाऱ्या वितरकांवर फौजदारी दाखल करण्यात येईल. नव्या तरतुदीनुसार हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.एखादा कर्मचारी ग्राहकांशी उद्धट वागत असल्यास त्याला वितरकांनी त्वरित काढून टाकावे, अन्यथा तक्रार झाल्यास त्या कर्मचाऱ्यामुळे वितरकांवर कारवाई होऊ शकते. जादा कनेक्शन आहेत, त्यामुळे सिलिंंडर ग्राहकांना पोहोच करू शकत नाही, सेवा देण्यात अडचणी व मर्यादा येत आहेत, अशी कारणे सांगितल्यास संबंधित वितरकाकडील कनेक्शन दुसऱ्याजवळच्या केंद्राला जोडले जाईल. शहर व ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबधारकांना विनाठेव सिलिंडर देणे आवश्यक आहे. अधिकाधिक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना विनाठेव कनेक्शन द्यावे. शेगडीसाठीच्या पैशांसाठी गावातील दानशूर व्यक्तींची मदत घ्यावी. नव्या नियमानुसार गॅस असलेल्या कुटुंबास रॉकेल देणे बंद केले आहे. यामुळे रॉकेलची बचत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गॅस कंपनीचे अधिकारी एस. के. कर्वे, एन. पी. अमृसकर, मोहनराव, डी. एम. सणगर, एम. ए. शिंदे, गॅस सिलिंडर वितरक, केंद्रचालक, संघटनेचे अध्यक्ष शेखर घोटणे यांच्यासह सर्व तालुक्याचे पुरवठा अधिकारी, केंद्रचालक उपस्थित होते. सध्याची यादी ग्राह्य धरा..दारिद्र्यरेषेखालील कुटुुंबांना विनाठेव सिलिंडर देताना यादी संबंधी अडचणी काही वितरकांनी उपस्थित केल्या. यावर आगवणे म्हणाले, सध्याच्या यादीत दारिद्र्यरेषेखाली नाव असल्यास त्या कुटुंबाला कनेक्शन द्यावे. रॉकेलमुक्तगाव करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
गॅस देण्यास विलंब केल्यास फौजदारी
By admin | Published: November 04, 2015 11:29 PM