: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशी ता. करवीर येथील बिरदेव यात्रा रद्द करुन ती साध्या पद्धतीने करण्यात आली असली तरी गेल्या तीन चार दिवसांपासून वाशीमध्ये परजिल्ह्यासह परराज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात बिरदेव मंदिर परिसरात दाखल झाल्याने गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. परिणामी, कोरोनाच्या नियमांचेही उल्लंघन झाले आहे. विशेष म्हणजे यात्रा काळात यात्रा व इतर धार्मिक कार्यक्रमावर कडक निर्बंध लावले असतानाही या गर्दीकडे ग्रामपंचायत प्रशासन, देवस्थान समिती, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाची भीती असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र, हे सर्वच नियम पायदळी तुडविले गेल्याने वाशी ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे
प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी वाशी ता.करवीर येथील बिरदेव यात्रेवर १४९ कलम लागू करून मोजक्याच भाविकांच्या व मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रा सुरळीत पार पडली. परंतु गेल्या चार दिवसांपासून वाशी गावामध्ये राज्य व परराज्यातून आलेले शेकडो भाविक एकत्र येऊन धार्मिक विधी करत आहेत. परिणामी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे. त्यांची ही कृती सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरणारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
फोटो : २४ वाशी बिरदेव मंदिर
मंदिर परिसरात झालेली भाविकांची गर्दी