CoronaVirus In Kolhapur : अनलॉकपूर्वीच कोल्हापुरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:42 PM2021-06-06T16:42:43+5:302021-06-06T16:46:01+5:30
CoronaVirus In Kolhapur : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.
कोल्हापूर : सोमवारपासून कोल्हापुरात अंशत: अनलॉक होणार असले तरी रविवारपासूनच शहरात अनलॉक झालंय असे समजून कोल्हापूर शहरवासियांनी तुफान गर्दी केली. शहरातील सर्व भाजी मंडईचा परिसर, बाजारपेठा, सर्वच रस्ते नागरीक आणि वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. कोल्हापूरकरांना अनलॉकची प्रतीक्षा लागून राहिली असून कधी एकदा पूर्ववत व्यवहार सुरू होतात याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याचेच प्रतिबिंब रविवारी पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आता ओसरत चालला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ शहरे ही पूर्णत: अनलॉक होत आहेत. म्हणजेच तेथील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होत आहेत. एकीकडे सर्व व्यवसाय सुरू होण्याची आस लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या स्तर चारमध्ये समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाने शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ सकाळी अकरापर्यंत होती ती आता दुपारी चारपर्यंत वाढविली आहे. त्याची अंमलबजावणी आज, सोमवारपासून होणार आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून घरात थांबलेल्या कोल्हापूरवासीयांना कधी एकदा घरातून बाहेर पडतोय, असे झाले आहे. त्याची प्रचिती रविवारीच आले.
रविवारी सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर नागरिकांची तसेच वाहनांची गर्दी झाली. भाजी मंडई सध्या बंद ठेवल्या असल्या तरी मंडईला लागून असलेल्या रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक रस्ते नागरीक, विक्रेत्यांच्या गर्दीने फुल्ल झाले होते. वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी कोंडी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. रविवारी बाजारपेठेत फेरफटका मारला असता फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला होता.
गेले दीड महिना शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. शहरात संचारबंदी, कडक निर्बंध, कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहिले. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याने सुरू होत असल्याने प्रत्येक व्यक्तीला, दुकानदारांना, व्यावसायिकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर येऊन पुन्हा एकदा जीवनाची विस्कटलेली घडी सुधारायची आहे.