मामाच्या गावी सुट्टीला आलेल्या कबनूरच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:41 PM2019-06-01T18:41:03+5:302019-06-01T18:41:58+5:30
सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. अंजली ऊर्फ अमृता बाळासाहेब चव्हाण (वय ९, रा. इंदिरानगर, कबनूर, ता. हातकणंगले) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती दीड महिन्यापूर्वी आपटेनगर येथे आजोळी आली होती.
कोल्हापूर : सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. अंजली ऊर्फ अमृता बाळासाहेब चव्हाण (वय ९, रा. इंदिरानगर, कबनूर, ता. हातकणंगले) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती दीड महिन्यापूर्वी आपटेनगर येथे आजोळी आली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंजली ऊर्फ अमृता ही कबनूरमध्ये इयत्ता तिसरी उत्तीर्ण झाली आहे. शाळेला सुट्टी पडल्याने ती कोल्हापुरात आपटेनगरातील मामाकडे दीड महिन्यापूर्वी राहण्यास आली होती. शनिवारी सकाळी तिचे मामा, आजी, आजोबा हे कपडे धुण्यासाठी पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधारा येथे गेले होते. त्यांच्यासोबत अंजलीही गेली होती.
तिने कपडे धुण्यासाठी आजीला मदतही केली. त्यानंतर ती नदीच्या पाण्यात कडेला बसून अंघोळ करीत होती. त्याच वेळी तिचा अचानक पाय घसरून ती खोल पाण्यात बुडाली. तिने केलेल्या आरडाओरड्यामुळे तिच्याकडे आजी-मामा धावले. तोपर्यंत ती बुडाली होती.
तातडीने मामा सचिन अरुण संकपाळ यांनी पाण्यात बुडून अंजलीला बाहेर काढले. तिच्या नाका-तोंडात पाणी शिरल्याने ती बेशुद्धावस्थेत होती. परिसरात पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मदतीने तिला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले. तत्पूर्वी तिचा दुर्दैवी अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अंजलीचे वडील बाळासाहेब चव्हाण यांचा कबनूर येथे सलूनचा व्यवसाय आहे. आई घरकाम करते, तर मोठा भाऊ दहावीचे शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारी तिच्या मृतदेहाचे सीपीआर रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या परिसरात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.