कोल्हापूर : लोणार वसाहत येथील वखारीत लाकूड कापत असताना कटर लागून सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीकांत विश्वनाथ लोहार (वय ४०, रा. सुतारवाडा, दसरा चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या उजव्या पायाची मांडी कापून रक्तस्राव होऊन त्यांचा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.पोलिसांनी सांगितले, श्रीकांत लोहार हे गेली २५ वर्षे सुतारकाम करीत होते. आठ दिवसांपूर्वी ते लोणार वसाहत येथील प्रकाश सखाराम वडणकर यांच्या वखारीमध्ये कामाला जात होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले.
वखारीत लाकूड कापत असताना कटर अचानक त्यांच्या उजव्या मांडीवर गेल्याने ती कापली जाऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. बेशुद्धावस्थेत त्यांना सहकाऱ्यांनी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती समजताच सुतारवाडा येथील त्यांच्या नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. श्रीकांत यांचा स्वभाव प्रामाणिक आणि कष्टाळू होता. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांचे चुलत भाऊ कुंडलिक दत्तात्रय लोहार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची वर्दी दिली.