बापरे... ! मार्चअखेरलाच कोल्हापूरचा पारा ४० अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:23 AM2021-03-31T04:23:19+5:302021-03-31T04:23:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला आग ओकणाऱ्या सूर्यामुळे कोल्हापूरकर कासावीस झाले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला आग ओकणाऱ्या सूर्यामुळे कोल्हापूरकर कासावीस झाले आहेत. मंगळवारी दुपारी तापमानाने या हंगामातील सर्वोच्च ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. मार्च अखेरलाच तापमानाने चाळिशी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून, गतवर्षीपेक्षा ही वाढ ५ ते ६ अंश सेल्सिअसने जास्त आहे. एप्रिल महिन्यात तर सूर्य आग ओकणार असल्याचे हवामानाचे आकडे सांगत आहेत. साधारणपणे ४३ ते ४४ अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता असून आताच घाम फुटण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर हे घाटमाथ्यावर असल्याने मुळातच याला गारव्याचे वरदान लाभले आहे; पण गेल्या पाच-सहा वर्षांत गारव्याचे रूपांतर हळूहळू वणव्यात होऊ लागले आहे. कितीही तापले तरी कोल्हापूरचे तापमान ४० पर्यंतच जाऊन थांबायचे, हेदेखील एप्रिल मे महिन्यात. गेल्या वर्षी मे महिन्यात ४१ ते ४२ तापमानाचा कडाका अनुभवावा लागला. यावर्षी मात्र मार्च संपण्याआधीच तापमानाने चाळिशी गाठली. मंगळवारी दुपारी तीन वाजता तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचले. पाच वाजेपर्यंत ते ३८ पर्यंत खाली आले. आज, बुधवारीदेखील हीच अवस्था राहणार आहे. सकाळी १० वाजता ३० अंशांपासून पारा पुढे सरकत एक वाजेेपर्यंत ३८, दोनपर्यंत ३९ आणि ३ वाजता ४० असा पारा चढता राहिला.
------------------------------------------
झाडांची सावली हवीहवीशी
उष्मा एवढा वाढला आहे की, झाडाची सावली आली आणि वाऱ्याची मंद जरी झुळूक आली तरी जिवाची घालमेल काहीशी कमी होत आहे. घशाला कोरड पडल्याने गारवा शोधण्यासाठी आइस्क्रीमसह थंड पेये व फ्रुट सॅलड खाण्यासाठी गर्दी वाढली आहे. डोक्यावर टोपी, हॅट, रुमाल यांशिवाय उन्हात फिरणे अवघड झाले असून अंग भाजून काढणाऱ्या झळांमुळे घामाच्या धारा वाहत आहेत.
------------------------------------------
मार्चअखेर तापलेलीच
गेल्या वर्षी मार्चअखेरला तापमानाचा पारा कमाल ३४, तर किमान २४ अंश सेल्सिअस इतका होता. संपूर्ण महिना तो कमी-अधिक प्रमाणात तसाच होता. या वर्षी मात्र तापमानात एकदम पाच ते सहा अंशांनी वाढत होत पारा ३५, ३६ असे करीत वेगाने ४०पर्यंत झेपावला आहे.
------------------------------------------
उष्णतेची प्रचंड लाट येणार
साधारणपणे २५ एप्रिलपर्यंत सूर्य आग ओकणार आहे. त्यानंतर मे महिन्यात पारा ३८ ते ३९ पर्यंत खाली येणार आहे. एप्रिल महिन्यात ५, ६, ७, ८ अशा चार दिवसांत तर उष्णतेची प्रचंड लाट येणार असून पारा ४३ ते ४४ अंशांवर राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने धास्ती वाढली आहे. मेमध्ये पारा कमी होणार आहे, एवढाच काय तो दिलासा आहे.