या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदाचा जिव्हाळ्याचा क्षण....!!
मात्र दुर्दैवाने आपण सारेच या सुखसोहळ्यास यावर्षी मुकलोय...
असो नाथ महाराजांची इच्छा
ही चैत्र यात्रा म्हणजे नेमके तरी काय?
काय वैशिष्ट्य आहे या यात्रेचे.
साऱ्या विश्वाचा मालक काय? या दिवशी आईच्या (येमाईच्या) भेटीला जातात, यामागचं नेमकं कारण तरी काय?
चला मग या चैत्र यात्रेचं महत्त्व जाणून घेऊ.
गुढीपाडव्याला सासनकाठी उभी करायची आणि मग कामदा एकादशीला ती सासनकाठी घेऊन डोंगरावर नाथांच्या दरबारात जायचं (कुणी एकादशीला येतं, तर कुणी बार्शीला डोंगरावर सासनकाठी घेऊन दाखल होतात. प्रत्येक जण आपल्या परंपरेनुसार सासनकाठी उभी करून डोंगरावर येतात.)
हस्त नक्षत्रावर श्री केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह यमाईच्या भेटीला निघतात. भक्त सासनकाठी मिरवत, गुलालाची मुक्त उधळण करत ‘चांगभलाऽऽ’चा गजर करत नाथांसोबत यमाईकडे जातात. ही चैत्र यात्रा म्हणजे जणू आनंदसोहळाच आहे, आई यमाई अर्थात रेणुका आणि ऋषिश्रेष्ठ जमदग्नी ऋषी यांच्या पुनर्मीलनाचा.
या मूळमाया यमाईने केदारनाथांच्या साहाय्याला हाकेला धावून बलाढ्य राक्षसांचा नाश केला आणि केदारनाथांना दक्षिणदिग्विजयी विजयी केलं, म्हणून केदारविजयामध्ये तिचं स्थान बहुत वेगळं आहे.
कृत युगात परशुरामाने पित्याच्या जमदग्नींच्या आज्ञेवरून रेणुकेचा शिरच्छेद केला. परशुरामाने आज्ञापालन करताच जमदग्नींनी प्रसन्न होऊन वर मागावयास सांगितला.
परशुरामांनी आईला (रेणुकेला) आणि त्याचबरोबर बंधूला उठवा, अशी विनंती केली. त्याप्रमाणे ऋषींनी रेणुकेला संजीवनी मंत्र म्हणून प्रकट होण्याची विनंती केली, तेव्हा आपण मातापूर (माहूर) येथे प्रकट होऊ, असे सांगितले. त्याप्रमाणे रेणुका माहूर येथे गळ्यापर्यंतच प्रकट झाली. परशुरामांनी आज्ञा न पाळल्यामुळे रुसली, तेव्हा जमदग्नींनी ज्योतिस्वरूप परमेश्वराला रेणुकेचे व आपले मीलन घडवण्याची विनंती केली. त्याप्रमाणे पूर्णब्रम्ह ज्योतिस्वरूपाने केदारनाथ रूपात प्रकट झाल्यानंतर रत्नागिरी पर्वतावर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पुनर्मीलन करण्याचे वचन दिले. हे सर्व आपल्या क्रोधामुळेच झाले, असे जाणून जमदग्नींनी आपल्या क्रोधाग्नीचा म्हणजेच रागाचा त्याग केला. तोच राग केदारनाथांनी धारण केला आणि रवळनाथ नामाभिधान झाले.
केदारनाथ महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिणेस दैत्य संसारासाठी निघाले, तेव्हा शक्तिद्वारे नाथांनी असुरांचा वध करवला.
औंध गावात (औंध गावाचे पूर्वीचे नाव कंटकगिरी ) औंधासूर नावाचा पराक्रमी असूर राज्य करीत होता आणि औंधासुराचा वध मूळमायेच्याहस्ते होणार, हे जाणून केदारनाथांनी मूळमायेला ये.... माई (तीच यमाई ) अशी साद घालून डमरूनाद केला. नाथांची साद ऐकून मूळमाया प्रकट झाली. यमाईने अक्राळविक्राळ रूप धारण करून औंधासुराचा वध केला. औंधासुराने मरतेसमयी माझे नाव अमर होऊदे, असा वर मागितला. तेव्हा यमाईने कंटकगिरीला औंध नाव दिले.
पुढे रक्तभोज रत्नासुराचा वध करून श्री केदारनाथ पुन्हा उत्तरेत हिमालयी निघाले आणि ही माहिती महालक्ष्मीला समजली, तेव्हा महालक्ष्मी अनवाणी पायाने डोंगरावर आली (तीच परंपरा भक्त आज "खेटे" म्हणून करतात) आणि नाथांना विनवणी केली की, आपण या रत्नागिरीवरच थांबावे. आपण जर इथे थांबणार नसाल, तर मलाही करवीराचे राज्य नको. मी देखील आपल्यासोबत हिमालयी येते. मग आईच्या महालक्ष्मीच्या या विनंतीला मान देऊन केदारनाथ रत्नागिरीवर थांबले. त्यांना थांबवून मग महालक्ष्मीने सर्व देवतांसमवेत श्री केदारनाथांचा रत्नागिरीवर राज्याभिषेक केला (त्यांचा सेनापती म्हणून पट्टाभिषेक केला नाही आणि मुळात नाथमहाराज हे कोणाचेही सेनापती नाहीत. ) नेमके यावेळी यमाईला आमंत्रण दिले नाही. राज्याभिषेकास आमंत्रण न दिल्यामुळे यमाई रुसली. यमाई रुसली आहे हे चोपडाईच्या लक्षात येताच तिने केदारनाथांना, यमाईला राज्याभिषेकास न बोलावल्याने यमाई रुसल्याचे सांगितले. तिचा रुसवा काढण्यासाठी औंधला जाण्यास सांगितले. तिचा रुसवा काढायला केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह चैत्र शुद्ध एकादशीला रत्नागिरीवरून औंधला जाण्यासाठी निघाले आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला औंधला पोहोचले. देवांना पाहताच यमाईने दार बंद केले. हे पाहून केदारनाथांनी सर्व देवांसह यमाईचे स्तवन केले. इतरांना वाटलं देवी रुसली, पण नाथांनी अर्थ ओळखला.
यमाईने दार लावून जणू नाथांना त्यांनी कृतयुगात जमदग्नींना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. जमदग्नी आणि (रेणुका) यमाईचे पुनर्मीलन घडवण्याची वेळ आली, हे जाणून केदारनाथांनी कृतयुगात धारण केलेल्या रागाचे म्हणजेच जमदग्नी ऋषींचे आई यमाईशी (म्हणजेच कृतयुगातील रेणुका) चैत्र शुद्ध पौर्णिमेला हस्त नक्षत्रावर लग्न लावले व कृतायुगात झालेली ताटातूट दूर करून दोघांचे पुनर्मीलन घडवले. या अलौकिक सोहळ्यानंतर केदारनाथांनी यमाईची राजोपचारे पूजा केली. तिसऱ्यावर्षी आई देवाला म्हणाली, तुम्ही आता मूळ पीठाला येण्याचे कष्ट घेऊ नका. मीच आपल्याजवळ रत्नागिरीवर येते, असे वचन दिले आणि दिलेल्या वचनाप्रमाणे यमाई मूळ पीठ सोडून रत्नागिरीवर चाफेबनात येऊन स्वयंभू प्रकट झाली.
आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात. ( देव सदरेवर पालखीत बसतात आणि देवांची कट्यार (जमदग्नी स्वरूप) आत यमाईच्या गाभाऱ्यात जाते. तिथ नाथांच्या आणि भक्तांच्या साक्षीने यमाई आणि कट्याररूपी जमदग्नींचा विवाह होतो.
असा हा चैत्र पौर्णिमेचा अगदी अलौकिक अविस्मरणीय सुखसोहळा.
संदर्भ:- केदार विजय ग्रंथ
माहिती साभार
श्री. सुनील आमाणे, सर (पुजारी)
जोतिबा डोंगर
श्री जोतिबा अभ्यासक