नृसिंहवाडी- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने येथील दत्त मंदिरात आज सकाळी चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. लॉकडाउनमूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने श्रावण गुरुवार व दक्षिणद्वार सोहळा या योगाचा लाभ घेऊन भाविकांना स्नान करता आले नाही.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने येथील नदीच्या पाणी पातळीत संथपणे घट होत होती. पाच ऑगस्ट रोजी पाणी पातळीत वाढ झाल्याने चालू सालातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला होता. त्यानंतर पाण्याच्या पातळीत बारा फुटाने वाढ होऊन पाणी स्थिर झाले होते.
आज सायंकाळी सहा वाजता मुख्य मंदिरातील पाणी कमी झालेने श्रींचे चरणकमलावर महापूजा करण्यात आली. त्यानंतर धूप दीप आरती होऊन धावे व करुणात्रिपदी म्हणण्यात आली व त्यानंतर मंदिरातशेजारती झाली.