Navratri 2023: नवमीला दक्षिणामूर्ती अंबाबाई; उद्या शाही दसरा सोहळा, सिमोल्लंघनाची तयारी पूर्ण
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 23, 2023 05:24 PM2023-10-23T17:24:01+5:302023-10-23T17:35:33+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात नवमीनिमित्त सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची दक्षिणामूर्ती देवतेच्या रुपात पूजा बांधण्यात आली. आज मंगळवारी ऐतिहासिक दसरा ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात नवमीनिमित्त सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची दक्षिणामूर्ती देवतेच्या रुपात पूजा बांधण्यात आली. आज मंगळवारी ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा होणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
रविवारी अष्टमीचा जागर झाल्याने सोमवारी सकाळी अंबाबाईचे मंदिर उशीरा उघडले. त्यानंतर देवीचा अभिषेक व दुपारची आरती झाल्यानंतर सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीदक्षिणामूर्ती हे भगवान शिवांचे साकार, ज्ञानस्वरूप रूप आहे. सर्व आगमशास्त्रे तंत्रविद्यांमध्ये श्रीदक्षिणामूर्ती हे आदिगुरू- संप्रदाय प्रवर्तक आहेत. यांच्या उपासनेने सर्व विद्या, रोग- निवारण, मोक्षप्राप्ती होते. मृत्युचक्र नष्ट करणारी देवता म्हणून यांचे मुख दक्षिण दिशेला असते. श्रीदक्षिणामूर्ती हे वटवृक्षाखाली ध्यानमग्न असून चतुर्भुज आहेत. ज्ञान हे निरंतर चिरतरुण असते, म्हणून ज्ञानमय दक्षिणामूर्ती नित्य तरुण असतात, तर ज्ञान घेणारा विद्यार्थी ‘वृद्ध’ होतो; 'वृद्धाः शिष्याः'। म्हणून त्यांच्या सभोवती ज्ञानार्थी वृद्ध असतात.
भगवान दक्षिणामूर्ती आपल्या शिष्यांना मौनाने उपदेश करीत असून, त्यातूनच शिष्यांच्या सर्व शंकांचे समाधान होत आहे. आद्य शंकराचार्यांचे श्रीदक्षिणामूर्ति स्तोत्र सुप्रसिद्ध आहे. श्रीदेवी माता ही आदिशक्ती असून सर्व सृष्टी, विद्या कला- अध्यात्माची जननी आहे; म्हणून ज्ञानरूपा श्रीदेवी मातेतील दक्षिणामूर्ती देवता तत्त्वाचे दर्शन घडवणारी महापूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.
उद्या, सायंकाळी ६ वाजता शाही दसरा सोहळा
कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा उद्या, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. राज्य शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने यंदा सोहळ्याची भव्यता वाढली आहे. या सोहळ्यासाठी अंबाबाई व तुळजाभवानीची पालखी दसरा चौकात येईल. शाहू छत्रपती यांचे मेबॅक कारमधून आगमन होईल. देवीची आरती व शमीपूजन झाल्यानंतर सीमोल्लंघन सोहळा होईल. त्यानंतर अंबाबाईची पालखी सिद्धार्थ नगर मार्गे मंदिरात परत येईल.